उज्वल भालेकर, अमरावती: जिल्ह्यात कोरोना विषाणूचा धोका पुन्हा एकदा डोके वर काढत असल्याचे दिसून येत आहे. दोन दिवसांमध्ये कोरोनाचे एकूण १४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे कोरोना सक्रिय रुग्णसंख्या ही ४१ इतकी झाली आहे. तर एच-थ्री एन-टू एन्फ्लूएंझाचे देखील दोन नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्ण संख्या ही पाचवर पोहचली आहे. या दोन्ही संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेता, जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणादेखील सतर्क झाली आहे.
जिल्ह्यात सध्या वातावरण बदलामुळे व्हायरल इन्फेक्शन वाढल्याने सर्दी, खोकला, ताप यासारख्या आजाराचे प्रमाण वाढले आहे. घरोघरी सर्दी खोकल्याचे रुग्ण वाढत आहेत. यातच जिल्ह्यात एच-थ्री एन-टू आजाराचाही शिरकाव झाला असून रुग्णांच्या संख्येत हळूहळू वाढ होत आहे. जिल्ह्यात दोन वर्षे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या फेज-२ इमारतीचा वापर करण्यात आला. परंतु मागील वर्षभरात कोविड रुग्णांची संख्या ही कमी होऊन शून्यावर पोहोचल्यानंतर मात्र आरोग्य प्रशासनाने येथील कोविड वाॅर्ड बंद केला. परंतु आता पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येतही वाढ होत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
दोन दिवसांमध्ये जिल्ह्यात १४ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये १८ मार्चला ८ तर १९ मार्चला ४२ पैकी ६ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ प्रयोगशाळा प्रमुख प्रशांत ठाकरे यांनी दिली.
इर्विनच्या वाॅर्ड क्र.१० मध्ये आयसोलेशन वाॅर्ड
कोरोना व एच-थ्री एन-टू रुग्णांच्या संख्येत होत असलेली वाढ लक्षात घेता, जिल्हा सामान्य रुग्णालयात (इर्विन) वाॅर्ड क्र. १० मध्ये बारा खाटांचे आयसोलेशन वाॅर्ड तयार करण्यात आले आहे. याठिकाणी एच-थ्री एन-टू पॉझिटिव्ह रुग्णांना ठेवण्यात आले आहे. तर कोरोना रुग्णांची लक्षणे ही सौम्य असल्याने ती गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत.
कोरोनाची रुग्ण संख्या वाढली असली तरी त्यांच्यामध्ये सौम्य लक्षणे आहेत. त्यामुळे त्यांना गृहविलगीकरणात ठेवले आहे. रुग्णांना रुग्णालयात ठेवण्याची वेळ पडल्यास इर्विन येथे आयसोलेशन वाॅर्ड स्थापन केला आहे. नागरिकांनीही संसर्गजन्य आजारापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी मास्कचा वापर करावा. -डॉ. दिलीप सौंदळे, जिल्हा शल्यचिकित्सक