संजय खासबागे / सतीश बहुरूपी
वरूड/ राजुरा बाजार : त्या दोघांनी प्रेमाच्या आणाभाका घेतल्या. लागलीच त्याने तिच्याकडे लग्नाचा तगादादेखील लावला. तरुणीनेदेखील कुटुंबाचा विरोध पत्करून प्रियकरासोबत यंदाच्या मार्चमध्ये नोंदणी विवाह केला. मात्र, तो प्रेमविवाह टिकला नाही. ६ जून रोजी तिने त्याच्याविरुद्ध बेनोडा पोलिस ठाण्यात धाव घेतली. काैटुंबिक वादामुळे तिने सासर सोडत जुलैमध्ये मावशीचे घर गाठले. इकडे त्याचा संताप वाढत गेला. अखेर त्याने सासू व मेहुण्याला पेट्रोलने जिवंत जाळले. अन् तो स्वत: देखील पेट्रोलने नाहला. प्रेम आणि विवाहाची त्यानेच सैतानी अखेर घडवून आणली. वैष्णवी ठाकरे हिने आई, भाऊ व पतीदेखील गमावला.
तालुक्यातील वंडली येथील एका घरात २४ सप्टेंबर रोजी उशिरा रात्री तिघांचे मृतदेह कोळसा झालेल्या स्थितीत आढळले. मृतांची ओळख लता सुरेश भोंडे (४७), त्यांचा मुलगा प्रणय सुरेश भोंडे (२२) व मारेकरी आशिष ठाकरे (२५, रा. वरूड) अशी पटविण्यात आली. सासू व मेहुण्याची हत्या केल्यानंतर स्वतःला पेट्रोल टाकून संपविल्याच्या या घटनेमुळे तालुका हादरला. आधी प्रेम, तीन वर्षे लिव्ह इन रिलेशनमध्ये राहिल्यानंतरही वैष्णवीच्या आई -वडिलांचा विरोध झाल्याने आशिषने पेट्रोल टाकून घर पेटविण्याची, तसेच कुटुंबातील सदस्यांना जीवानिशी मारण्याची धमकी दिली होती. अखेर त्या धमक्यांना बळी पडून २३ मार्च २०२३ रोजी त्यांचा नोंदणी विवाह झाला.
प्रकरण पोहोचले पोलिसांत
तीन महिने सोबत राहिल्यानंतर वैष्णवी आशिषचे वरूड येथील घर सोडून मावशीकडे येऊन राहिली. वाणिज्य पदवीधर असलेल्या वैष्णवीने एका कंपनीत वर्क फ्रॉम होम जॉब सुरू केला. दरम्यानच्या काळात त्याने तिच्या नावावर कर्ज काढून ते भरण्याकरिता तिला धमक्या दिल्या. त्यामुळे ती जून महिन्यात ठाण्यात गेली. प्रकरण बेनोडा पोलिस ठाण्यातून महिला सेलला गेले. पती आशिषने माहेरून पैसे आणण्यासाठी तगादा लावतोय. त्याने आपला छळ चालविल्याची ती तक्रार होती.
कॉल करुन सांगितले.. त्यांना मारले, मी मरतो
आशिषने रविवारी रात्री १२:३० च्या सुमारास वंडली गाठले. सासूच्या घरी पोहचल्यावर १२:३७ वाजता मावससासऱ्यांना फोन केला. परंतु त्यांनी कॉल रिसिव्ह केला नाही. त्याने दुसऱ्या क्रमांकावरून ‘मी सासू लता आणि साला प्रणय याला पेट्रोल टाकून जाळले. आता मीसुद्धा मरतो’ असे सांगितले. फोन कॉलवरून बेनोडा पोलिसांना घटनाक्रम उलगडण्यात लागलीच यश आले. पत्नी वैष्णवी मावशीकडे असल्याने वाचली. आशिष हा तिला नांदायला येण्याचा तगादा लावत होता. पत्नी वैष्णवी मावशीकडे असल्याने त्यांनादेखील तो धमक्या द्यायचा. यामुळे पत्नी आणि तिचे नातेवाईक त्रस्त झाले होते.
आकांत कानी पडला नाही
रविवारी रात्री वंडली येथील एका गणेश मंडळात भजनाचा कार्यक्रम सुरू होता. मागील बाजूचा दरवाजा सासूने उघडला. सासू लता व मेहुणा प्रणय हे झोपेत असतानाच त्याने त्यांच्या अंगावर पेट्रोल ओतून आग लावली. आरडाओरड झाली. मात्र, भजनाच्या आवाजात ती ओरड कुणाच्या कानी पडली नाही. सासू व साला जळून खाक झाल्याचे बघताच त्याने स्वत: लाही संपविले.
आशिषने मला लग्न करण्यास भाग पाडले. तो माझ्या आई व भावाला त्रास देत होता. त्याने माझ्या नावावर २ लाख रुपये कर्ज घेतले होते. भरणा करण्यासाठी त्रास देत होता. जुलैपासून मी मावशीकडे राहत होते. मी पोलिस ठाण्यात तीन तक्रारी दिल्या. पोलिसांनी दखल घेतली असती आई व भावाचा जीव वाचला असता.
- वैष्णवी ठाकरे, मृत आशिषची पत्नी
आरोपी आशिषच्या मावस सासऱ्याच्या तक्रारीवरून दुहेरी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी भेट दिली. पत्नी माहेरी गेल्याच्या रागातून आरोपीने दोघांचा खून करून स्वत: ला संपविल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले.
- अविनाश बारगळ, पोलिस अधीक्षक