दर्यापूर (अमरावती) : त्याचा निश्चय पक्का झाला होता. बहिणीला अंतिम क्षणापूर्वी त्याने व्हिडीओ पाठविला आणि पुढच्याच क्षणी फासावर झुलला. मात्र, त्याचे मरणच आले नव्हते. त्यामुळे बहिणीच्या माहितीवरून घरी दाखल झालेल्या पोलिसांनी दार तोडले आणि पाय पकडून ठेवून सैनिकाचे प्राण वाचविले. दर्यापूर शहरातील शांतीनगर येथील या घटनेने बुधवारी दिवसभर खळबळ माजली होती.
सागर हरिदास पाटील (३०, रा. शांतीनगर, दर्यापूर) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या सैनिकाचे नाव आहे. ते जम्मू काश्मीर या ठिकाणी कर्तव्यावर कार्यरत आहेत. काही दिवसांपूर्वीच ते सुट्टीवर घरी परतले होते. बुधवारी सकाळी १० च्या सुमारास राहत्या घरी गळफास घेण्यापूर्वी गुजरात येथे वास्तव्यास असणाऱ्या बहिणीला त्यांनी व्हिडीओ कॉल केला. मी आत्महत्या करीत आहे, असे कळविले. बहिणीने तत्काळ दर्यापूर पोलिसांशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली. त्यावरून ठाणेदार संतोष ताले यांनी तत्परतेने पोलीस नाईक अनिल आडे, कॉन्स्टेबल पवन पवार व शरद आडे यांना तत्काळ घटनास्थळी पाठवले.
गळफास लावलेल्या अवस्थेत पाय पकडले...
पोलिसांनी सैनिकाच्या घराचे दार तोडून गळफास घेतलेल्या अवस्थेतील सागर पाटील यांचे पाय पकडले आणि गळ्यातील फास सोडवून दर्यापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ भरती केले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना अमरावती येथे उपचारासाठी पाठवण्यात आले. वृत्त लिहिस्तोवर आत्महत्येच्या प्रयत्नाचे कारण पुढे आलेले नाही.
थेट ठाणेदारांना फोन
सागर पाटील यांची बहीण गुजरातला बीएसएफमध्ये कार्यरत आहे. भावाचा व्हिडीओ धडकताच त्यांनी दर्यापूरचे ठाणेदार संतोष ताले यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी पथक पाठविले. त्यांना सामाजिक कार्यकर्ते रुपेश मलिये यांनी घर शोधून दिले.
विवाहित असलेले सागर पाटील यांची १२ वर्षांची नोकरी झाली आहे. त्यांच्या आत्महत्येच्या प्रयत्नामागे घरगुती वाद आहे का? याचा तपास केला जात आहे.