लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : बडनेरा विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार प्रीती संजय बंड यांना ऑटो संघटनेने रविवारी आयोजित सभेद्वारे जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे बंड यांची उमेदवारी भक्कम झाली असून, त्यांना ऑटो संघटनेचे बळ हे आता मतदारसंघात नवा आयाम देणार असल्याची खात्री ऑटो संघटनेचे सर्वेसर्वा नितीन मोहोड यांनी यावेळी दिली.
बडनेरा मार्गावरील जाधव पॅलेस येथे ऑटो संघटनेच्या सर्व पदाधिकारी आणि सदस्यांची सभा रविवारी पार पडली. या सभेत एकमुखाने बंड यांना जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय ऑटो संघटनेने घेतला. अवघ्या काही दिवसांतच प्रचाराची आघाडी घेतलेल्या प्रीती संजय बंड यांच्या पाठीशी जनसामान्यांची ताकद मोठ्या प्रमाणात उभी होताना दिसत आहे. प्रीती बंड जनसामान्यांची शक्ती आणि गेल्या १५ वर्षांत बडनेरा मतदारसंघाच्या झालेल्या परिस्थितीचा विचार करता, ऑटो संघटनेने प्रीती बंड यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. बडनेरा मतदारसंघातील ऑटो चालक आपली ताकद दाखवून देणार, असे आश्वासन ऑटो युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी दिले. प्रीती बंड यांनी ऑटो संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. या सभेला ऑटो संघटनेचे अध्यक्ष नितीन मोहोड, संतोष शेरेकर, संतोष भंडारकर, अब्दुल अशफाक, संतोष सोनटक्के, पंकज सूर्यवंशी, बाळू सखे यांच्यासह संघटनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांसोबत नाना नागमोते, उमेश घुरडे, अनिल सोनटक्के, डॉ. अल्वीना हक, बाबा राठोड, जितू ठाकूर, विभा गौरखेडे आदी उपस्थित होते.
आजपासून 'ऑटो'च्या प्रचाराला लागू : नितीन मोहोड प्रीती बंड यांच्या पाठीशी बडनेरा मतदारसंघातील जनशक्त्ती मोठ्या प्रमाणात उभी आहे. त्यामुळे आम्ही प्रीती बंड यांना जाहीर पाठिंबा देत आहे. प्रीती बंड यांचे 'ऑटो' हे बोधचिन्ह असून, सोमवारपासून आम्ही 'ऑटो रिक्षा'चा प्रचार करणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष नितीन मोहोड यांनी सांगितले.
रवी नगर येथे प्रचार पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद अपक्ष उमेदवार प्रीती संजय बंड यांच्या प्रचारार्थ रविवारी व्यापक जनसंपर्क अभियान रवी नगर भागात राबवून मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधला. यावेळी त्यांचे घरोघरी उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. श्री संत ज्ञानेश्वर मंदिर येथून प्रचार अभियान सुरू होत पुढे महेश्वर मंदिर, राम मंदिर, गजानन महाराज मंदिर, हनुमान मंदिर परिसर, छांगाणी नगर, न्यू छांगाणी नगर, न्यू रवी नगर, न्यू गणेश कॉलनी, अंबा विहार, पार्वती नगरमार्गे महेश नगर येथे समारोप झाला.