अमरावती : सध्या देशात आणि राज्यात तूरडाळीसह मसूर व इतर डाळींचे भाव वाढत चालले आहेत. त्यामुळे डाळींचा साठेबाजार होऊ नये यासाठी शासनाने दक्षता घेतली असून जिल्ह्यांतील व्यापारी, विक्रेते आणि दाल मिल उद्योजकांकडे उपलब्ध साठ्याची माहिती आठवड्याच्या दर शुक्रवारी जाहीर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठी जिल्हा पुरवठा विभाग आता ॲक्शन मोडवर आला आहे. जिल्ह्यातील सरकारी गोदामांबरोबर खासगी गोदामेही तपासण्याच्या सूचना जिल्हा पुरवठा विभागाने दिल्या आहेत. याकरिता जिल्हा पुरवठा अधिकारी डी. के. वानखडे यांच्या मार्गदर्शनात सहायक पुरवठा अधिकारी वैशाख वाहूरवाघ यांच्या नेतृत्वात पथक गठित केल्याची माहिती पुरवठा विभागाच्या सूत्रांनी दिली.अत्यावश्यक वस्तू कायदा १९५५ ईसी १९५५ च्या कलम ३ अंतर्गत स्टॉक होल्डिंग संस्थाद्वारे तूर आणि उडीद साठा व्यापारी, उद्योजक आणि विक्रेत्यांनी जाहीर करण्याचे बंधनकारक केले आहे. उपलब्ध असलेला तूर आणि उडदाचा साठा आठवड्याच्या दर शुक्रवारी ऑनलाईन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी दाल मिलचे विभाग त्यांच्या परवान्याचे नूतनीकरण तहसीलदारांकडे प्रलंबित असल्याने त्यांचा उपलब्ध साठा जाहीर करता येत नाहीत, असेही शासनाच्या निदर्शनास आले आहे.
त्यासाठी एफएसएसएआय, जीएसटी नोंदणी, एपीएमसी नोंदणी, गोदामांबरोबरच आता खासगी गोदामांचीही तपासणी करावी, अशा सूचना शासनाकडून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे जिल्हा पुरवठा विभागही आता ॲक्शन मोडवर आला असून, पुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांसह तालुक्याच्या तहसीलदारांनीही या गोदामांची तपासणी करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.शासनाकडून डाळींच्या साठेबाजीच्या अनुषंगाने गोदामाची तपासणी करण्याबाबत सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्या अनुषंगाने जिल्हा पुरवठा विभागाचे सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या नेतृत्वात तपासणी पथक गठित केले आहे. या पथकामार्फत गोदामाची तपासणी केली जाईल.डी. के. वानखेडेजिल्हा पुरवठा अधिकारी