अनंत बोबडे
अमरावती : दर्यापूर तालुक्यातील लोतवाडा येथील गाव तलावाच्या आऊटलेटची दिशा बदलविण्यासाठी पुकारण्यात आलेल्या आंदोलनात सरपंच महिलेसह तीन महिलांनी विषाचा घोट घेतला. त्या तिघींनाही अत्यवस्थ स्थितीत अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याची माहिती सूत्रांनी दिली. गुरुवारी दुपारी लोतवाडा येथे आंदोलनस्थळी ही घटना घडली.
दरवर्षी पावसाळ्यामध्ये लोतवाडा गावातील नागरिकांच्या घरात गाव तलावाचे पाणी शिरते, त्यामुळे अतोनात नुकसान होते. जीवितहानी टाळता येणार नाही, अशी स्थिती आहे. सबब, गाव तलावाला हटवून इतरत्र गाव तलाव निर्माण करावा किंवा या गाव तलावाच्या आऊटलेटची दिशा बदलावी, यासाठी गुरुवारी लोतवाडा येथील ग्रामस्थांपैकी सहाजणांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. पोलीस घटनास्थळी पोहोचताच तीन महिलांनी विष घेतले. तर उर्वरित तीन आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सरपंच पंचफुला कुऱ्हाडे, कोकिळा रक्षे, सुमित्रा रायबोले अशी विष घेणाऱ्या महिलांची नावे आहेत.
आश्वासनपूर्ती न झाल्याने आंदोलन
लोतवाडा येथे पाटबंधारे विभागाने दहा वर्षांपूर्वी गाव तलाव तयार केला. पाणी गावात शिरत असल्याने अनेक नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान होते. जीवितहानी देखील नाकारता येत नाही. गतवर्षी तेथे भीमराव कुऱ्हाडे यांनी जलसमाधी आंदोलन केले होते. त्यावेळी पाटबंधारे विभागाने लेखी आश्वासन देत हा गाव तलाव हटविण्याबाबत पत्रव्यवहार देखील केला होता. मात्र, आश्वासनपूर्ती न झाल्याने कुऱ्हाडे यांच्या नेतृत्वात सरपंच पंचफुला कुऱ्हाडे, कोकिळा रक्षे, सुमित्रा रायबोले, राजू रक्षे, सुभाष रायबोले यांनी पाटबंधारे विभागाला २४ फेब्रुवारीपर्यंतचा अल्टिमेटम दिला होता. मात्र, दखल न घेण्यात आल्याने गुरुवारी गाव तलावाजवळ आंदोलन करण्यात आले.