अमरावती: शहरात रेती तस्कर सुसाट सुटले असून, त्यांची मजल चक्क वाहतूक पोलीस निरिक्षकाला धमकी देण्यापर्यंत पोहोचली आहे. साहब, आप मेरी गाडी कैसे क्या ऑफिस लेकर जाते हो, मै देखता हू, असे म्हणत यापुर्वीची गाडी आपण कारवाई न करता कशी सोडली, त्या वाहनातील रेती एमआयडीसीत कशी खाली केली जात आहे, त्याचा व्हिडिओ मी काढला आहे, तो व्हायरल करण्याची धमकी त्या रेती तस्कराने दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. ११ मार्च रोजी स्थानिक एमआयडीसी परिसरात ही घटना घडली.
याप्रकरणी शहर वाहतूक शाखा (पश्चिम)चे पोलीस निरिक्षक राहूल आठवले यांनी राजापेठ पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी शेख आमिन (रा. जुनीवस्ती, बडनेरा) याच्याविरूध्द शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा नोंदविला. आठवले हे शनिवारी पेट्रोलिंग करीत असतांना एमआयडीसी चौकात त्यांना दोन ट्रकमधून क्षमतेपेक्षा अधिक रेतीची वाहतूक होत असल्याचे दिसले. त्यांना थांबवून कागदपत्रांची पाहणी करत असताना एक इसम समोर आला. त्याने स्वत:ची ओळख शेख आमिन अशी दिली. आपला रेतीचा व्यवसाय असून आपण जो ट्रक पकडला आहे, तो आपला आहे, ते सोडून द्या, असे तो आठवले यांना म्हणाला. त्याला समजावून ते वाहन वाहतूक शाखेत घेऊन जात असताना तिसरा ट्रक एमआयडीसीच्या आत जाताना आठवले यांना दिसला. त्याला थांबवुन तो ट्रक देखील वाहतूक कार्यालयात नेण्याची सुचना आठवले यांनी केली. तेथून आठवले थोडया दूर अंतरावर आले असता, तो वाहनचालक ट्रकमधील रेती एमआयडीसीतच खाली करत असून, तो वाहन वाहतूक शाखेत आणण्यास नकार देत असल्याची माहिती एका अंमलदाराने आठवले यांना दिली.
ट्रक रस्त्यावर ठेऊन तो पसार
अंमलदाराच्या त्या माहितीवरून पीआय आठवले हे तेथे पोहोचले. त्यावेळी शेख आमीन पुन्हा आठवलेंकडे आला. ‘आप मेरी गाडी कैसे क्या ऑफिस लेकर जाते हो मै देखता हु, एमआयडीसीमे खडी गाडी वही खाली हो रही है, मैने उसका व्हिडिओ बनाया है, वो व्हिडिओ सब जगह भेजकर आपने वो गाडी छोडी, ऐसा बताकर आपकी बदनामी करुंगा और आप बाकी गाडीयो पर कैसे कार्यवाही करते हो, ये भी में देख लेता हू, असे तो उध्दटपणे बोलला. ट्रक रस्त्यावर लावून ट्रकची चावी घेऊन गेला. तथा वाहन घेऊन जात असलेल्या हरिश नामक अंमलदाराशी देखील तो उध्दटपणे वागला. अखेर सायंकाळी आठवले यांनी याबाबत राजापेठमध्ये तक्रार नोंदविली.