अमरावती : पदवीधर मतदारसंघासाठी सोमवारी २७,९०४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ही ४३.३७ टक्केवारी आहे. सन २०१७ च्या तुलनेत तब्बल १६.५१ टक्के मतदान कमी झाले. पदवीधरांमध्ये यावेळी उत्साह का नाही, यासोबतच मतदानाचा कमी झालेला टक्का, कुणाला देणार धक्का, याविषयी आता राजकीय फैरी झडत आहेत. प्रत्यक्षात गुरुवारी मतमोजणी अंती चित्र स्पष्ट होईल.
सकाळी १० पर्यंत २०१४ पुरुष व ७१८ स्त्री असे एकूण २७३२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ही ४.२५६ टक्केवारी बहुतेक उमेदवारांचे बुथ व मतदार केंद्रांवर मतदारांची फारसी गर्दी दिसत नव्हती. दुपारी १२ पर्यंत ६,३२३ पुरुष व २४८४ स्त्री असे एकूण ८८०७ मतदारांचे मतदान झाले. ही १३.६९ टक्केवारी होती.
दुपारनंतर मतदान केंद्रांवर पदवीधरांची गर्दी बरी होती. तिसऱ्या टप्प्यात म्हणजेच दुपारी २ पर्यंत ११६५९ पुरुष व ५१६७ स्त्री असे एकूण १६,८२६ मतदारांनी मतदारांनी मतदान झाले. ही २६.१५ टक्केवारी होती. मतदानाचे शेवटच्या टप्प्यात दुपारी ४ पर्यंत १८ ६४१ पुरुष व ९२६४ स्त्री असे एकूण २७९०५ मतदान ४३.३७ टक्के मतदान झाल्याचे निवडणूक विभागाने सांगितले.
बुथवर फारसी गर्दी अन् नेते दिसेना..
शहरासह जिल्ह्यातील मोजके बुथ वगळता उर्वरित बुथवर फारसी गर्दी व राजकीय नेते व पदाधिकारी दिसून आलेले नाही. ज्या बुथवर गर्दी दिसत होती, त्यामध्ये राजकीय कार्यकर्त्यांचा भरणा अधिक होता. मतदार केंद्रांवरही पहिल्या सत्रात शुकशुकाट दिसून आल्याने टक्का माघारणार, हे चित्र स्पष्ट होते.
यावेळी सर्व केंद्रांवर ‘वेब काॅस्टिंग’
यापूर्वीच्या निवडणुकीत फक्त संवेदनशील केंद्रांवरच ‘वेब कॉस्टिंग’ केल्या जात होते. यावेळी भारत निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील सर्वच म्हणजेच ७५ मतदान केंद्रांवर ही सुविधा होती. सर्व मतदान केंद्रांवरील मतदान प्रक्रियेचे लाईव्ह चित्रण नियंत्रण कक्षात दिसत होते.
विभागात अमरावती शहर निर्णायक !
मतदारसंघात पाचही जिल्ह्याच्या २.६ लाख मतदार संख्येच्या तुलनेत सर्वाधिक २५ हजारांवर मतदान एकट्या अमरावती शहरात होते तसेच २६२ मतदान केंद्रांच्या तुलनेत ४१ केंद्र अमरावतीला होते. त्यामुळे उमेदवाराच्या विजयावर अमरावतीकरांची मोहोर राहणार असल्याची चर्चा आहे.
वरुड, अंजनगावात नवरदेवाचे मतदान
वरुडच्या जागृत विद्यालयातील मतदान केंद्रात हळदी लागलेल्या नवरदेवाने राष्ट्रीय कर्तव्य बजावले. प्रवीण शंकरराव शेळके (रा. काटी) असे त्यांचे नाव आहे. त्यांच्यासोबत मनोज भड, नंदू घोरपडे, अक्षय खराटे, मनोज वरठी आदी मित्र मंडळी यांनीदेखील मतदानाचा हक्क बजावला.
सन २०१७ व २०२३ मधील तुलनात्मक मतदान
१) सन २०१७ मध्ये जिल्ह्यात ७६,६८६ मतदार होते. यामध्ये ३०१०० पुरुष व १५,७७३ स्त्री असे एकूण ४५८७३ मतदान झाले. ही ५९.८२ टक्केवारी होती
२) २०२३ मध्ये ६४,३४४ मतदारसंख्या आहे. यामध्ये १८६४१ पुरुष व ९२६४ स्त्री असे एकूण २७९०५ मतदान झाले. ही ४७.३७ टक्केवारी आहे.