अमरावती : विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय (सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल) येथे शुक्रवारी ३९ वी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली. यामध्ये पत्नीच्या मायेमुळे तिच्या पतीचा जीव वाचला आहे. दोन्ही किडनी खराब झालेल्या आपल्या ५३ वर्षीय पतीला ४५ वर्षीय पत्नीने किडनी दान करीत नवे जीवनदान दिले आहे.
आईच्या मायेचा अनुभव हा प्रत्येकालाच अनेकवेळा आला असेल. मुलासाठी आई आपल्या जिवाची पर्वा न करता काहीही करायला तयार असते. विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय येथे आतापर्यंत झालेल्या किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेमध्ये किडनी दान करण्यामध्ये आईची संख्या अधिक आहे. परंतु, ३ मे रोजी पार पडलेल्या शस्त्रक्रियेमध्ये पत्नीने पतीला किडनी दान केली आहे. अकोला येथील रहिवासी असलेल्या प्रकाश मनोहर सालफळे (वय ५३) यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याने मागील १४ महिन्यांपासून त्यांच्यावर डायलिसिस उपचार सुरू होते. डायलिसिस करतेवेळी होत असलेला आपल्या पतीचा त्रास लक्षात घेता, तसेच आपल्या कुटुंबाचा विचार करता पत्नी वंदना प्रकाश सालफळे (वय ४५) हिने आपली किडनी दान करण्याचा निर्णय घेत पतीला नवे जीवनदान दिले आहे. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत ही शस्त्रक्रिया विनामूल्य करण्यात आली.
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे एमएस डॉ. अमोल नरोटे, ओएसडी डॉ. मंगेश मेंढे यांच्या मार्गदर्शनाखाली नेफरोलॉजिस्ट डॉ. अविनाश चौधरी, युरो सर्जन डॉ. राहुल पोटोडे, डॉ. विक्रम देशमुख, डॉ. राहुल घुले, डॉ. विशाल बाहेकर, डॉ. प्रतीक चिरडे, बधिरीकरणतज्ज्ञ डॉ. रोहित हातगावकर, डॉ. बाळकृष्ण बागवाले, डॉ. दीपाली देशमुख, डॉ. जफर अली, डॉ. माधव ढोपरे किडनी ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटर डॉ. सोनाली चौधरी यांनी यशस्वी शस्त्रक्रिया केली. यावेळी परिचारिका अनिता तायडे, सरला राऊत, नीता कांडलकर, कविता बेरड, नीलिमा तायडे, लता मोहता, कीर्ती तायडे, स्नेहल काळे, अभिषेक नीचत, नम्रता दामले, अभिजित देवधर, अनिता खोब्रागडे, योगीश्री पडोळे, रेखा विश्वकर्मा, वैभव भुरे, अनु वडे, नितीन मते, वैभव भुरे, गौरव वानखडे, श्रद्धा वढे, आहारतज्ज्ञ कविता देशमुख यांनीदेखील यावेळी सहकार्य केले.