अमरावती : मोर्शी येथील माडू नदीच्या पात्रात मृतावस्थेत सापडलेल्या तरुणाच्या मृत्यूचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्या तरूणाचा मृत्यू आकस्मिक नव्हे, तर त्याचा खून करण्यात आल्याचे सहा महिन्यानंतर स्पष्ट झाले आहे. राज उईके असे मृत तरुणाचे नाव आहे.
याप्रकरणी, मृताचा मित्र परसराम वरकडे (२१, धुंडा बोरगाव, जि. बैतुल, मध्यप्रदेश) याच्या तक्रारीवरून मोर्शी पोलिसांनी आरोपी रोशन टाकरखेडे (२२) व सिध्दू मुंद्रे (३०, दोन्ही रा. अंबाडा, ता. मोर्शी) यांच्याविरूध्द ५ जून रोजी रात्री १२ पुर्वी खून, खुनाचा पुरावा नष्ट करण्याचा गुन्हा दाखल केला. १ जानेवारी रोजी रात्री ८ च्या सुमारास राज उईके याचा मृतदेह माडू नदीच्या पात्रात आढळून आला होता. आकस्मिक मृत्यूचा तपास व शवविच्छेदन अहवालाअंती त्याचा खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले.
परसराम वरकडे याच्या तक्रारीनुसार, आरोपी रोशन व सिध्दू यांनी राज उईके व परसराम यांना नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी फिरायला जाऊ, अशी सुचना केली. त्यानुसार त्या दोघांनी १ जानेवारी रोजी राज व परसराम यांना मध्यप्रदेशातील आठनेर येथून कावला, किलबिरा, नळा या गावांच्या मार्गे मोर्शी येथील माळू नदीच्या पुलावर आणले. तेथे रात्री आठच्या सुमारास रोशन टाकरखेडे याने राज उईके याच्याशी मुलीच्या कारणावरून वाद घातला. त्याचवेळी रोशनने लोखंडी वस्तुने राज याच्या डोक्यावर वार केला. त्याला त्याच अवस्थेत पुलावरून माडू नदीच्या पात्रात ढकलून दिले. त्यामुळे तो मरण पावला. मित्राला धमकी व मारहाण
हा सर्व प्रकार परसरामच्या डोळयासमोर झाला. मात्र त्याला आरोपींनी घटनेची वाच्यता केल्यास, पोलिसांना सांगितल्यास तुला सुध्दा मारून टाकू, अशी धमकी दिली. त्याला देखील लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यामुळे सहा महिने त्याने भीतीपोटी तोंड उघडले नाही.