अमरावती : ‘तू आमच्याच हाताने मरणार’ असे म्हणत एका २५ वर्षीय तरूणावर चाकूने सपासप वार करण्यात आले. यात हल्ल्यात त्या तरूणाची बाहिण देखील जखमी झाली. ९ डिसेंबर रोजी रात्री ९ च्या सुमारास बेनोडा येथील पंचशिल झेंड्याजवळ ही घटना घडली. याप्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी चौघांविरूद्ध जीवघेणा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल केला. रोहीत उर्फ नादो विजय भोंगळे (२५) व सोनू विजय भोंगळे (दोघेही रा. बेनोडा) अशी जखमी बहीण भावाची नावे आहेत. जुन्या वैमनस्यातून आपल्या मुलांवर चार आरोपींनी प्राणघातक हल्ला चढविल्याची तक्रार नादोच्या आईने पोलिसांत नोंदविली.
शुक्रवारी रात्री रोहीत उर्फ नादो हा घराच्या अंगणात असताना प्रवीण बन्सोड, रूपेश बन्सोड आणि अनिल जोंधळे तसेच एक अनोळखी इसम असे चार जण त्याच्या घरात चाकु घेऊन शिरले. येताना चौघांनी, नादो, आता तुला सोडणार नाही, तू आमच्या हाताने मरणार’ असे म्हणून जोरजोराने शिवीगाळ करत व हातातील चाकू फिरवत येत असताना आजुबाजूचे लोक भितीने आपापले घरात पळून गेले. त्यावेळी अंगणात असलेल्या चौघांनी मिळून नादोवर चाकूने वार केलेत. नादोला भोसकत असल्याने त्याची आई व बहीण सोनू मध्ये गेल्या. मात्र हल्लेखोरांवर त्याचा परिणाम झाला नाही. त्यांनी नादोच्या मुलाला पाठीवर, डोक्यावर, पोटावर चाकूने वार करून त्याला जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने गंभीर जखमी केले. तर, प्रविण बन्सोड आणि रूपेश बन्सोड यांनी सोनुच्या हातावर, पोटावर आणि पाठीवर चाकूने वार करून तिला देखील जखमी केले.
म्हणून पळाले हल्लेखोर
घटनेवेळी शेजारी राहणाऱ्या ती महिला मदतीकरीता धावल्याने चारही हल्लेखोर पळून गेले. नादो याला जिल्हा सामान्य रुग्णालय व पुढे एका खासगी रूग्णालयात हलविण्यात आले. तर, अश्विनी उर्फ सोनू हिच्यावर डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी प्रवीण उर्फ पिंटू भीमराव बनसोड (३९), रूपेश भीमराव बनसोड (४२, दोघेही रा. बेनोडा जहांगिर), अमोल जोंधळे (३८, रा. भीमटेकडी) व सै. नाजिल सै. सत्तार (३२, राहुलनगर) यांच्याविरूध्द १० डिसेंबर रोजी पहाटे २ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला.