अमरावती : अचलपूर येथे अण्णा भाऊ साठे दलितवस्ती सुधार योजनेंतर्गत मंजूर विकासकामे न करता ५.५० कोटींचे देयके काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार तपासणी पथक समितीच्या अहवालातून पुढे आला आहे. याप्रकरणी नगरपरिषदेचे दोषी अधिकारी, पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी रिपाइंचे शहराध्यक्ष किशोर मोहोड यांनी केली आहे.
अचलपूर येथे दलितवस्ती सुधार योजनेचा निधी त्याच कामांवर खर्च न करता अन्य ठिकाणी केल्याप्रकरणी येथील विभागीय आयुक्त कार्यालयातील नगरपालिका प्रशासनाच्या सहआयुक्त माधुरी मडावी यांनी १८ जुलै २०२३ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नगरविकास शाखेचे जिल्हा सहआयुक्तांना पत्र पाठवून तांत्रिक अहवालाच्या आधारे योग्य ती कार्यवाही करून अहवाल पाठविण्याचे निर्देशित केले आहे. दलितवस्ती सुधार योजना असो वा रमाई आवास योजना असो त्याकरिता शासनाने निकष, नियमावली ठरवून दिली असताना अन्य ठिकाणी निधी खर्च करणे म्हणजे शुद्ध निधीची चोरी आहे. हा प्रकार अतिशय गंभीर असल्याचा आरोप तक्रारकर्ते किशोर मोहोड यांनी केला असून, यातील दोषींवर कठोर शासन करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तपासणी पथक समितीने १७ ऑगस्ट रोजी सादर केला अहवाल
विभागीय आयुक्त कार्यालयाचे सहा. संचालक लेखा दिगंबर नेमाडे, नगर अभियंता विनय देशमुख, लेखापाल श्रीपाद केऱ्हाळकर, कर व प्रशासकीय सेवा संवर्गाचे विकास गावंडे या चार सदस्यीय तपासणी पथक समितीने १७ ऑगस्ट अचलपूर येथील दलितवस्ती योजनेच्या निधीतून झालेल्या विकासकामांचा वस्तुनिष्ठ अहवाल प्रशासनाकडे सादर केला आहे.
ही कामे झालीच नाही तरीही देयके निघाली
- जयभवानी हाॅटेल ते सोनोने यांच्या घरापर्यंत पेव्हिंग ब्लॉक बसविणे
- लालपूल चौक ते एसडीओ कार्यालयापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूने पेव्हिंग ब्लॉक
- दुल्हागेट ते बुद्ध पुतळा पेव्हिंग ब्लॉक बसविणे
तपासणी पथक समितीच्या अहवालानुसार अचलपूर येथे दलितवस्ती सुधार योजनेच्या कामात गैरप्रकार झाल्याचे निदर्शनास आले आहे. आता पुढील कारवाईसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नगर विकास शाखेच्या सहआयुक्तांना पत्र पाठविले आहे.
- माधुरी मडावी, सहआयुक्त, (नपाप्र) विभागीय आयुक्त कार्यालय