शेंदूरजनाघाट : परिसरातील संत्रा बागेत गळती झालेली आंबिया बहाराची संत्रा फळे चोरून नेत ती विकल्याच्या तक्रारी वाढल्या असून, याबाबत पोलीस ठाण्यात तक्रारसुद्धा केल्याचे शेतकरी सांगतात. बोराएवढी संत्रा फळे चोरीला जात असल्याने संत्रा उत्पादक हवालदिल झाले आहेत.
शेंदूरजनाघाट परिसरात आंबिया बहाराची बोराएवढी झालेली संत्री गळून जमिनीवर पडल्यानंतर ती वेचून विकली जात आहेत. यंदा या परिसरात आंबिया बहार पाहिजे तसा फुलला नाही, संत्रा झाडावर अनेक रोगांनी आक्रमण केल्याचे दिसून येते आहे तर कधी अधिक तापमान तर कधी ढगाळ वातावरणामुळे संत्रा फळे मोठ्या प्रमाणात गळत आहेत. ती वेचून जमा करण्याकरिता काही शेतकरी संमती देतात तर काही विरोध करतात. तर काही शेतकऱ्यांना न विचारताच संत्री वेचली जात आहेत. काही शेतातील खाली पडलेली संत्रा फळे वेचून काहीजण मात्र झाडावर असलेली संत्रीसुध्दा तोडून नेत असल्याची ओरड होत आहे.