विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका : जुळ्या शहरात नियमांची ऐशीतैशीपरतवाडा : अचलपूर शहरात अवैध वाहतुकीचा सुळसुळाट सर्वसामान्य नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांच्या जीवावर उठला आहे. स्वतंत्र वाहतूक विभाग असताना अवैध वाहतूकदारांच्या खुलेआम दादागिरीचे चित्र पोलिसांच्या हप्ताखोरीने सुरू असल्याचा संतापजनक प्रकार थांबविण्याची मागणी करण्यात आली आहे.परतवाडा शहरातील अवैध आणि बेशिस्त वाहतुकीला लगाम लावण्यासाठी वाहतूक विभाग कमी पडत असल्याचे दस्तुरखुद्द त्या विभागानेच जाहीर करून टाकले आहे. वाहतूक विभाग नाममात्र असल्याचे चित्र आहे. ३५ पोलीस कर्मचारी कार्यरत असताना केवळ १७ कर्मचाऱ्यांवरच गत वर्षभरापासून कारोभार सुरू आहे. साप्ताहिक सुटी, दोन कार्यालयीन कामात, दोन चालक, बंदोबस्त आणि काही मोक्याच्या ठिकाणी कर्मचारी लावण्यात येत असले, तरी शहरातील महत्त्वपूर्ण अपघातप्रवण स्थळ कर्मचाऱ्यांअभावी बेवारस सोडण्यात आले आहे. बैतुल स्टॉपवर बेशिस्तीचा कहरमिर्झा चौक, बैतुल स्टॉप, लाकूड डेपो रोडवर तर अवैध आणि खासगी वाहतूक मिनीट्रकचा कहर असतो. त्यांना हटकले असता वाहनधारक मुजोरी करतात. तसेच याच परिसरात चार शाळा, महाविद्यालये, कॉन्व्हेंट आहेत. बेशिस्त भरधाव मिनीट्रक आॅटोरिक्शा पाहता मोठा अपघात होण्याची भीती आहे. अचलपूरचे उपविभागीय अधिकारी जयंत मीणा यांना तशी लेखी तक्रार जीवनविकास संस्थेचे मुकुंद देशमुख यांनी दिली आहे. या मार्गावर वाहनांची सातत्याने वर्दळ राहत असून वाहतूक पोलिसांची नियमित गस्त राहणे गरजेचे आहे. याकडे लक्ष असणे गरजेचे झाले आहे. (तालुका प्रतिनिधी)बसस्थानकातील प्रवाशांची चोरीपरतवाडा शहर जिल्ह्यातील मोठे ठिकाण असल्याने अकोला, दर्यापूर, अंजनगाव, इंदोर, खंडवा, धारणी, चिखलदरा, बैतुल, भैसदेही, चांदूरबाजार, अमरावती या मार्गावर मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक सुरू असते. परतवाडा स्थानकातून प्रवाशांना नेण्यासाठी दिवसभर स्पर्धा पाहायला मिळते. बसस्थानक परिसरात दोनशे मीटर अंतरापर्यंत खासगी वाहन उभे न करण्याचा नियम आहे. येथे आर्थिक हप्ताखोरीमुळे वाहतुकीचे नियम धाब्यावर बसविण्यात आले आहे. एक चालान, दिवसभर दादागिरीशहरातून दिवसभर विविध मार्गांवर धावणाऱ्या खासगी वाहनांसह ट्रॅव्हल्सला चुकून वाहतूक पोलिसांनी चालान दिले की, नियमानुसार २४ तासांपर्यंत दुसरे चालान देता येत नाही आणि याच नियमाच्या आड दिवसभर खासगी ट्रॅव्हल्सचालकांची दादागिरी शहरात दिसून येते. हे चित्र मोठ्या अपघाताला निमंत्रण देणारे ठरले आहे. दुसरीकडे चालान फाडल्याचे सांगून वाहतूक पोलीसही मोकळे होतात. आॅटोरिक्षाचालकांची अरेरावी, केळीवाले उर्मटअवैध वाहतूक, ट्रॅव्हल्सवाले कमी पडले की काय, त्यावरही कळस पाहता दिवसभर बसस्थानक परिसरात आॅटोरिक्शाचालकांची अरेराव आणि ट्रॅव्हल्सजवळ केळीविक्री करून रस्त्यावरच फेकण्यात येणारी केळींची साल अपघाताला आमंत्रण देत आहेत. कोण लावणार लगाम ?मागील वर्षी तीन महिन्यांत बसस्थानक ते जयस्तंभ चौकापर्यंत ट्रक अपघातात पाच निष्पापांचे बळी गेले. त्यानंतरसुद्धा जिल्हा प्रशासन किंवा पोलीस प्रशासनाच्या वतीने बेशिस्त वाहतुकीला आळा घालण्यासाठी कायम उपाययोजना न आखता वेळ मारून नेण्यातच धन्यता मानावी, हे विशेष. शहरात वाढती वाहतूक पाहता आमदार बच्चू कडू यांनी चांदूरबाजार नाका ते बैतुल स्टॉपपर्यंत रस्ता चौपदरीकरणाचे कार्य हाती घेतले. अर्ध्याहून अधिक काम झाले असताना बेशिस्त वाहतुकीवर कुणालाच अजून तरी लगाम न लावता आल्याने जुळ्या शहरातील नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. गुरुवारपासून वाहतूक विभागाची सूत्रे घेतली. बसस्थानकाच्या २०० मीटर परिसरात उभ्या असलेल्या सहा वाहनांवर कारवाई केली. अवैध आणि खासगी वाहतुकीची बेशिस्त खपून न घेता कारवाई केली जाईल - बाबाराव अवचार,वाहतूक पोलीस अधिकारी
पोलिसांची हप्ताखोरी, अवैध वाहतूक जोरावर
By admin | Published: March 18, 2017 12:17 AM