अमरावती : शासकीय आरोग्य केंद्र वा रुग्णालयात उपचाराअभावी रुग्णाचा मृत्यू झाल्यास कर्तव्यावर असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्याला निलंबनाला सामोरे जावे लागणार आहे. त्याच्यावर शिस्तभंगविषयक कारवाईचा बडगादेखील उगारला जाणार आहे. याबाबत २७ ऑगस्ट रोजी सार्वजनिक आरोग्य विभागाने परिपत्रक पारित केले आहे.
छातीत दुखत असल्याने एका शासकीय रुग्णालयातील अपघात विभागात दाखल झालेल्या रुग्णावर वेळीच उपचार न केल्यामुळे व रुग्णाकडे दुर्लक्ष केल्याने रुग्णाचा मृत्यू झाला. त्याप्रकरणी तत्कालीन वैद्यकीय अधिकाऱ्याविरुद्ध करण्यात आलेल्या विभागीय चौकशीचे प्रकरण शासनाच्या विचाराधीन आहे. त्या चौकशीदरम्यान नोंदविलेल्या निरीक्षणाअंती असा प्रकार आढळल्यास वैद्यकीय अधिकाऱ्याचे थेट निलंबन करण्याचे आदेश पारित करण्यात आले आहेत.
...असे नोंदविले निरीक्षण
रुग्ण रुग्णालयात पोहोचूनही वैद्यकीय अधिकाऱ्याच्या अनास्थेमुळे किंवा त्यांनी केसपेपरवर रुग्णाचे नाव व इतर नोंदी नसल्याच्या कारणाने रुग्णास तात्काळ वैद्यकीय उपचार मिळत नसतील, ते गैर आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन अशा घटना घडू नयेत, म्हणून कर्तव्यात कसूर करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यावर कारवाई करण्याच्या सूचना आरोग्यमंत्र्यांनी दिल्या. बरहुकूम तसे आदेश काढण्यात आले.
///////
काय आहेत आदेश
शासकीय आरोग्य केंद्र, रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांवर, रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्याच्या अनास्थेमुळे एका विभागातून दुसऱ्या विभागात उपचारासाठी फिरावे लागल्यास व त्यास वेळीच उपचार न मिळाल्याने रुग्णाचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याचे निदर्शनास आल्यास कर्तव्यातील कुचराईसाठी जबाबदार ठरवून संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करण्यात येईल. त्याच्यावर महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम १९७९ मधील नियम ३ चा भंग केल्याच्या कारणास्तव कारवाई करण्यात येईल.