अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अधिनस्थ अभियांत्रिकी महाविद्यालयांकडून परीक्षा व मूल्यांकन विभागाला सहकार्य केले जात नाही. मूल्यांकन केंद्रावर दोन दिवसांत अधिकारी पाठविले नाही तर अभियांत्रिकी महाविद्यालयांना नव्याने नामांकन देणार नाही, असे खरमरीत पत्र विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने प्राचार्यांना पाठविले आहे.
यंदा अमरावती विद्यापीठात आॅफलाईन मूल्यांकन प्रारंभ झाले आहे. त्याकरिता अभियांत्रिकी परीक्षांच्या आॅफलाइन मूल्यांकनाची तयारी चालविली आहे. मूल्यांकन केंद्राकडे पेपर तपासणीला पाठविण्यापूर्वी मास्क तयार करणे, उत्तरपत्रिका, मूल्यांकनाचे नियोजन, परीक्षा केंद्रानुसार बारीक-सारीक तयारी करावी लागते. त्याअनुषंगाने परीक्षा व मूल्यांकन विभागाला अभियांत्रिकी महाविद्यालयातून मनुष्यबळ आवश्यक आहे.
तथापि, २२ पैकी केवळ दोनच अभियांत्रिकी महाविद्यालयांंनी अधिकारी पाठविले. अन्य २० अभियांत्रिकी महाविद्यालयांनी विद्यापीठात अधिकारी पाठविण्यास पाठ दाखविली आहे. त्यामुळे यंदा आॅफलाइन मूल्यांकन करून वेळेत निकाल लावण्याची जोरदार तयारी चालविली असताना, या प्रक्रियेला महाविद्यालयांतून नख लावण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. परिणामी विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यांकन विभागाने अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम व बुलडाणा या पाचही जिल्ह्यांच्या अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या प्राचार्यांना दोन दिवसांत महाविद्यालयाने अधिकारी पाठवावे, अन्यथा येत्या सत्रात अभियांत्रिकी महाविद्यालयांना नामांकन देणार नाही, असा दम पत्राद्वारे भरण्यात आला आहे.
पी.आर. पोटे आणि हव्याप्र मंडळाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाने दोन अधिकारी पाठविले. उर्वरित २० अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या प्राचार्यांना पत्राद्वारे त्वरेने अधिकारी पाठविण्याबाबत अवगत केले आहे, अन्यथा येत्या सत्रात या अभियांत्रिकी महाविद्यालयांना मूल्यांकन देणार नाही, असे कळविले आहे. - हेमंत देशमुख, संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ अमरावती विद्यापीठ