संदीप मानकर
अमरावती : जिल्ह्यातील २६५५ शासकीय कार्यालयांकडे सव्वातीन कोटींच्या घरात थकबाकी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तातडीने प्रलंबित विद्युत बिलांचा भरणा न केल्यास या कार्यालयांचासुद्धा वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता असल्याचे महावितरणच्या सूत्रांनी दिली.
महावितरणच्या चारही डिव्हिजनमध्ये लहान-मोठे २६५५ शासकीय कार्यालयांकडे ३ कोटी १४ लाखांची वीज थकबाकी आहे. महावितरणची आर्थिक परिस्थिती गंभीर असून विद्युत बिलाची वसुली प्राधान्याने करावे, असे निर्देश संचालक (संचालन) संजय ताकसांडे यांनी अधिकाऱ्यांना दिले होते. सर्व कार्यकारी अभियंत्यांना शासकीय कार्यालयातील विद्युत बिले तातडीने वसूल करण्याच्या सुचना दिल्या आहेत. आम्हाला शासकीय फंड आला नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येते. मात्र, बिल न भरल्यास आम्हाला कारवाई करावी लागेल, असे अधीक्षक अभियंता दिलीप खानंदे यांनी स्पष्ट केले.
अशी आहे थकबाकी
अचलपूर उपविभागात २८८ कार्यालयांकडे ३६.३४ लाख थकबाकी आहे. अंजनगाव १३५ (१५.४६ लाख), चिखलदरा १०० (५.०९), दर्यापूर २२५ (१७.५५), धारणी १३६ (३०.०६), अमरावती (रुरल) मध्ये अमरावती १३७ (१२.२३), बडनेरा ८३ (४.७६), भातकुली १२३ (१०.०२), चांदूर रेल्वे १५६ (११.८२), धामणगाव १४७ (९.४५), नांदगाव खंडेश्वर ९४ (९.७३), तिवसा १३९ (२३.५५), अमरावती (शहर) मध्ये अर्बन-१ २१७ (५४.०१), अर्बन-२ १०७ (२८.२६), अमरावती ११७ (१३.०६ ), मोर्शी (डिव्हिजन) मध्ये चांदूर बाजार १३४ (१३), मोर्शी १६० (९), शेंदूरजनाघाट २९ (१.८४), वरूड १२८ (९.३१) अशी थकबाकी आहे.