अमरावती : शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने राज्यातील अकृषी विद्यापीठांचा आढावा घेऊन पदांचे आकृतीबंध ठरविताना विद्यमान पदांमधून ३० टक्के पदे कपात करण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे अत्यंत विपरीत परिणाम विद्यापीठांच्या कामकाजावर होणार आहे. सरकारने पद कपातीचे धोरण मागे न घेतल्यास सर्व अकृषी विद्यापीठ तीव्र आंदोलनासह बंद पाडू, असा निर्धार कर्मचारी संघटनांनी घेतला आहे.
अकृषी विद्यापीठाच्या कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींची मुंबई येथे शनिवारी संयुक्त बैठक झाली. यात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते, हे विशेष. महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष रमेश शिंदे, कार्याध्यक्ष अजय देशमुख, मागासवर्गीय महासंघाचे अध्यक्ष•नितीन कोळी, सचिव दीपक मोरे, महाराष्ट्र युनिव्हर्सिटीज आॅफिसर्स फोरमचे सचिव दिनेश कांबळे,•दीपक वसावे, मुंबई विद्यापीठ कर्मचारी संघाचे प्रभारी अध्यक्ष अभय राणे, सरचिटणीस रूपेश मालुसरे, मुंबई विद्यापीठ कर्मचारी कल्याणकारी समितीचे अध्यक्ष अविनाश तांबे हे उपस्थित होते.
शासनाच्या वित्त विभागाने राज्यातील विविध विभागांचा आढावा घेऊन पदांचे आकृतीबंध ठरविताना विद्यमान पदांमधून ३० टक्के पदे कपात करण्याचे निर्देश•२९ जून, २०१७ च्या शासन निर्णयान्वये दिले आहे. वास्तविक हे निर्देश ज्या विभागांनी पदनिर्मितीसाठी निकष, कार्यप्रणाली व मार्गदर्शक तत्त्वे ठरविलेली नाहीत, त्या शासकीय विभागांसाठी आहेत. मात्र, उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अखत्यारीतील अकृषी विद्यापीठांसाठी हे निकष व कार्यप्रणाली ६ जुलै, २००९ रोजी निश्चित करण्यात आली आहे. विद्यापीठांमध्ये प्रवेशित विद्यार्थी संख्येच्या आधारे पदनिर्मिती करण्याचे ठरविण्यात आले असून, त्याचवेळी प्रत्येक विद्यापीठांची १८ ते २८ टक्के पदे कपात केली.
परंतु, शासन निर्णयाचा चुकीच्या पद्धतीने अर्थ काढून राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांतील शिक्षकेतर कर्मचाºयांच्या पदांमध्ये ३० टक्के कपात करण्याचा घाट उच्च शिक्षण संचालनालय व उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालयातील काही उच्चपदस्थ अधिकाºयांचा असल्याचा आक्षेप घेण्यात आला. मात्र, या निर्णयाविरूद्ध तीनही शिखर संघटना एकवटल्या आहेत. महासंघ मिळून राज्यस्तरीय कृती समिती गठित करण्यात आली आहे.
उच्च शिक्षण संचालनालय विद्यापीठे व मंत्रालय यात समन्वयक म्हणून भूमिका पार पाडण्याऐवजी हटवादी भूमिका घेऊन मंत्रालयाची दिशाभूल करीत आहे. विद्यापीठे सक्षम करण्याऐवजी विद्यापीठांचे पंख छाटण्याचा हा प्रकार आहे.- अजय देशमुख,अध्यक्ष, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ कर्मचारी संघटना