अमरावती : नजिकच्या सुकळी येथे महापालिकेच्यावतीने साकारण्यात आलेल्या कंपोस्ट डेपो इतरत्र हलविला नाही तर गुरूवारी ५ फेब्रुवारीपासून कचऱ्याची वाहने परत पाठवू, असा निर्वाणीचा इशारा परिसरातील नागरिकांनी प्रशासनाला दिला आहे. या अनुषंगाने सोमवारी आयुक्त अरूण डोंगरे यांना निवेदन सादर करण्यात आले.नगरसेवक प्रवीण हरमकर, माजी नगरसेवक बबन रडके, अब्दुल रफिक, अब्दुल गफ्फार राराणी, राजेश अंबाडकर, विलास पवार, आशीष अतकरे, राजा खारकर, मोहम्मद शकील, मधुकर खारकर, नितीन नाथे आदींच्या नेतृत्वात महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात पेठ अमरावती येथे सुकळी परिसरात साकारलेला कंपोस्ट डेपो इतरत्र हलविण्यात यावा, शहरातील कचऱ्याची पाचही झोनमध्ये विभागणी करावी, पेठ अमरावती कंपोस्ट डेपो येथे प्रस्तावित कचऱ्यापासून खत निर्मिती प्रकल्प थांबवून दुसरीकडे स्थानांतरित करावा, अशा विविध मागण्या यावेळी प्रशासनाकडे रेटून धरण्यात आल्या. यापूर्वी महापालिका प्रशासनाने घनकचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी शहरात झोननिहाय जागेची व्यवस्था करून कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे ठरविले होते. मात्र आमसभेत झालेल्या या निर्णयाला बगल देत केवळ पेठ अमरावती सुकळी परिसरातच कचरा डेपो निर्माण करण्यात आला आहे. दर दिवसाला कचरा डेपोकडे येणारी वाहने ही परिसरातील नागरिकांसाठी आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक ठरत आहे. कचऱ्याची टेकडी निर्माण झाल्यामुळे आरोग्य, शेती, पर्यावरण धोक्यात आले आहे. परकोटाच्या आत आणि मुस्लिम वस्त्यांमध्ये या तुंबलेल्या कचऱ्यामुळे रोगराई पसरत असल्याचा आरोप नगरसेवक प्रवीण हरमकर यांनी केला आहे. घनकचरा व्यवस्थापनासाठी घेण्यात आलेली शेती ही सुपीक आहे. असे असताना तोकडे दर शेतकऱ्यांच्या हाती देण्यात आले, असा आरोपही करण्यात आला. शेती गेल्यामुळे बेरोजगारी निर्माण होऊन स्थानिकांना विस्थापित होण्याची वेळ आली आहे. कचरा डेपो इतरत्र हलविल्या गेला नाही तर याचे गंभीर परिणाम होतील, असा इशारा महापालिका प्रशासनाला देण्यात आला आहे. यावेळी भानुदास लंगडे, अक्षय वाळके, कुसूम लंगडे, भावना नांदूरकर, वंदना अंबाडकर, रेखा देवे, राहूल लकडे, चंद्रशेखर फुलाडी, पवन भांगे, विशाल वानखडे आदी उपस्थित होते. यापूर्वी कचरा डेपोचे आरक्षण गायब झाल्याचा आरोपही प्रवीण हरमकर यांनी केला. (प्रतिनिधी)
-तर गुरूवारपासून कचऱ्याची वाहने परत पाठवू
By admin | Published: February 02, 2015 10:58 PM