जिल्हाभरात वादळी पाऊस : झाडे उन्मळली, वीजपुरवठा खंडितअमरावती : शुक्रवारी सायंकाळी ४.३0 च्या सुमारास अचानक आलेल्या वादळी पावसाने जिल्हाभरात धुमाकूळ घातला. ठिकठिकाणी घरे, दुकानांची हानी झाल्याची माहिती आहे. चांदूरबाजार तालुक्यातील बेलज येथे चक्रीवादळाने २५ घरांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. शुक्रवारी दुपारपर्यंत उन्हाचा पारा कायम असताना अचानक सायंकाळी वातावरणात बदल होऊन आलेल्या चक्रीवादळामुळे बेलज या पुनर्वसित गावाला चांगलाच तडाखा बसला. गावातील २५ घरांची मोठय़ा प्रमाणात पडझड झाली. छतावरील टीनपत्रे उडाली. याशिवाय गावातील आठ विजेचे खांब कोसळले. यामुळे अनेक घरातील टीव्ही संचांचे नुकसान झाले. वादळात उत्तम इंगळे नामक इसम गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारार्थ चांदूरबाजार येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ग्रामपंचायत कार्यालयात आश्रयअमरावती : उघड्यावर आलेल्या कुटुंबांना तात्पुरत्या स्वरूपात ग्रामपंचायत कार्यालयात आश्रय देण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच चांदूरबाजार तहसीलचे नायब तहसीलदार चव्हाण, गटविकास अधिकारी तुकाराम टेकाडे मंडळ अधिकारी गजेंद्र मानकर हे बेलज गावात पोहोचले असून ते चक्रीवादळग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी सरसावले आहेत. प्रशासनातर्फे या कुटुंबांची राहण्याची व जेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. अचानक आलेल्या या संकटाने बेलज गावात खळबळ उडाली आहे. जिल्ह्यासह शहरातही नुकसान जिल्हयासह शहरात वादळी पावसाने कहर केला आज उष्णतामान ४६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले असताना सायंकाळच्या सुमारास पडलेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला. चक्रीवादळामुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली. (प्रतिनिधी)
बेलज येथे २५ झोपड्या उडाल्या
By admin | Published: June 07, 2014 12:41 AM