अमरावती: विरोधी पक्ष असूनही काँग्रेसची चांगली संस्कृती, अनेक सुसंस्कृत नेते आहेत. मी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्यासह अनेक नेत्यांना जवळून बघितले, अनुभव घेतला. परंतु खासदार प्रणिती शिंदे, आमदार यशोमती ठाकूर यांच्याबाबत फारच वेगळा अनुभव येत आहे, असे मत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
परवा सोलापुरात आढावा बैठकीला गेलो असता प्रणिती शिंदे आल्या. मला बैठकीचे निमंत्रण नाही. मी म्हणालो ही बैठक प्रशासकीय आहे. याचे निमंत्रण नव्हते. आल्या तर बसा. पण भाजपचे दोन आमदार बैठकीत कसे? त्या बैठकीत दोन-अडीच तास बसल्यानंतर निघून गेल्या. नंतर कार्यकर्त्याच्या बैठकीत गेल्यानंतर मी ‘चंपा’च्या बैठकीला गेले होते. माझे वय काय? तुझे वय काय? मी आपली संस्कृती सोडणार नाही. मी म्हणायला गेलो तर तोंडावर पडाल. अगदी तसेच यशोमतीताई ठाकूर यांच्याबाबत आज घडले, असे पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.