अमरावती : गेल्या खरिपात बाधित २४,८५५ शेतकऱ्यांच्या पूर्वसूचना पीकविमा कंपनीद्वारा नाकारण्यात आल्या होत्या. या सर्व पूर्वसूचनांची पडताळणी करण्याचे आदेश दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी स्तरावरून विमा कंपनीला देण्यात आले आहेत. त्यानंतर रब्बीचाही हंगाम आटोपला आहे. शेतात पीक नसल्याने या पूर्वसूचनांची पडताळणी कशी, असा शेतकऱ्यांचा सवाल आहे.
खरिपाच्या हंगामात स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी १,१५,२२३ व काढणीपश्चात नुकसान यासाठी ९,२२४ अशा एकूण १,२४,४४७ शेतकऱ्यांच्या पूर्वसूचना पीकविमा कंपनीला प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी २४,८५५ पूर्वसूचना अर्ज कंपनीद्वारा विविध कारणे दर्शवून नाकारले होते. सतत पाऊस सुरू असल्याने या पूर्वसूचना ग्राह्य धरण्यात याव्यात व पडताळणी करण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी कंपनीला दिल्या होत्या.
राज्य व्यवस्थापक जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीला आले होते तेव्हादेखील त्यांना देण्यात आल्या होत्या. याशिवाय कृषी आयुक्तालयानेही पीकविमा कंपनीला पत्र देऊन सर्व पूर्वसूचना ग्राह्य धरण्याचे निर्देश दिले होते. मात्र, कंपनीस्तरावर याबाबत कुठल्याही सूचना काढण्यात आल्या नाहीत. आता पुन्हा याविषयी कंपनीला निर्देश देण्यात आले आहेत. मात्र, शेतकऱ्यांच्या शेतात पीक नसल्याने पूर्वसूचनांची पडताळणी कशी करणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे.कंपनीद्वारा नाकारलेले तालुकानिहाय अर्ज
कंपनीद्वारा २४,८५५ पूर्वसूचना नाकारल्या आहेत. यामध्ये अचलपूर ८३६, अमरावती २३४५, अंजनगाव सुर्जी ७६५, भातकुली २०४१, चांदूर रेल्वे ७८३, धारणी २२१, मोर्शी २१३६, नांदगाव खंडेश्वर ७१८३, तिवसा १७०१ व वरूड तालुक्यात १६४३ पूर्वसूचनांचा समावेश आहे.