अमरावती : जिल्ह्यात अनियंत्रितपणे वाढू लागलेल्या कोरानाने देशातील नागरिकांचे आणि जगभरातील तज्ज्ञांचे लक्ष वेधले. साखळी तोडण्यासाठी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी लाॅकडाऊनची घोषणा केली. लोकमतने तीन चाैकांत 'रिॲलिटी चेक' केले. शहरात 'लाॅकडाऊन' नसावाच जणू अशी स्थिती दिसून आली. पोलिसांनी त्यांचे कर्तव्य चोख पार पाडले नाही. एक रिपोर्ट..
पंचवटी चाैक : दिवसभर वर्दळ, पोलिसांसमोर 'राॅंग साईड'ही
लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नागपूर, परतवाडा, वरूड आणि चांदूर बाजारकडे ये-जा करण्यासाठी याच पंचवटी चौकातून जावे लागते. मंगळवारी येथे वाहतूक सिग्नल बंद होते. कर्तव्यावरील पोलीस, राज्य राखीव दलाचे कर्मचारी कार, दुचाकीचालकांना रोखत नव्हते. त्याचा फायदा घेत वाहनचालक विरुद्ध दिशेने बिनधास्त वाहने नेत होते. पोलीस रस्त्यालगत झाडाच्या सावलीचा आश्रय घेत मोबाईलवर मग्न होते. कोण येत आहे आणि कोण जात आहे, याच्याशी काहीही घेणे-देणे नसल्याची त्यांची शैली होती. नजीकच्या पेट्रोल पंपवरून इंधन भरल्यानंतर राँग साईड येणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कारवाईसाठी झाडाची सावली सोडून कुणीही पुढे आले नाही. दिवसातून तीनवेळा लोकमत चमूने या चाैकाचे निरीक्षण केले. प्रत्येकवेळी पोलीस सावलीत ठाण मांडून बसलेले दिसून आले. जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशानुसार दुचाकीवरील दोघांनीही हेल्मेट घालणे बंधनकारक आहे. त्या आदेशाची वाट लावण्यात आली.
शेगाव नाका चाैक : पोलीस ठाण्यालगतचा चौकही बिनधास्त
लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : हाकेच्या अंतरावर गाडगेनगर पोलीस ठाणे. वाहनांची तपासणी करण्यासाठी रस्त्यावर बॅरिकेड. शेगाव नाक्यावरील ही स्थिती लॉकडाऊनचे गांभीर्य दर्शविणारी. पण, अंमलबजावणी करणारे पोलीस विलासनगरकडे जाणाऱ्या मार्गावर उभ्या एक ऑटोरिक्षात बसून होते. वाहतूक सिग्नल बंद असल्याने पोलिसांना बाय देत वाहने भुर्रकन पुढे निघत होती. दुचाकी वाहनांची झालेली गर्दी कोरोना वाढीस पोषक अशीच होती. कठोरा नाका येथून येणाऱ्या ऑटोरिक्षांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहून नेले जात होते. या वर्दळीच्या चौकात एकमेव महिला कर्मचारी कर्तव्यावर होती. ती सर्व प्रकार निमूटपणे बघत होती. चौकात भाजीपाला विक्रेते दिलेल्या मुदतीनंतरही दुकान मांडून होते. ये-जा करणाऱ्यांना कुणाचीच राेकटोक नसल्यामुळे जणू लाॅकडाऊन नसावाच, असा संचार या चाैकात दिसून आला. अनेक मोहल्ल्यांना जोडणारा हा चौक वर्दळीचा आणि महत्त्त्वाचा आहे.