दरदिवशी रुग्ण वाढतच, खासगी रुग्णालयातील उपचाराचा खर्च व कालावधी आवाक्याबाहेर..!
अमित कांडलकर - गुरुकुंज (मोझरी) : डेंग्यूचे रुग्ण तिवसा तालुक्यात दरदिवशी वाढतच असून आरोग्य विभागाच्यावतीने एक दिवस धूरळणी करून ‘चमकोगिरी’ करण्यात ही यंत्रणा वेळ खर्ची घालत आहे. अनेक गावांमध्ये डेंग्यू रुग्ण झपाट्याने वाढत असून, प्रामुख्याने गुरुकुंज मोझरी, तिवसा व अन्य गावांचा यात समावेश आहे.
डेंग्यू आजारात प्रथमोपचार घेण्यात अधिक दिवस घालवल्यास ग्रामस्थांना अनेक जीवघेण्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सुरुवातीला ताप काही तासांच्या अंतराने परत येतो. नंतर उलट्या, डोकेदुखीसारखी लक्षणे दिसतात. योग्य प्रतिजैविके तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योग्य वेळी मिळणे आवश्यक आहे. सोबतच सातत्याने उपचाराधीन डॉक्टरांच्या देखरेखीखाली रुग्ण राहिल्यास आजारातून यशस्वी सुटका मिळते. गावपातळीवर आजार का पसरतोय, याची मिमांसा आवश्यक आहे. एकीकडे आरोग्य विभागाने एक दिवस कोरडा पाळा, असा धोशा चालवला आहे. पण, प्रत्यक्षात ‘आजरापेक्षा इलाज भारी’ अशी अवस्था आहे. गुरुदेवनगरसारख्या सुसंस्कृत नगरीत कित्येक वर्षांपासून नियमीत पाणीपुरवठा होत नसल्याचे विदारक सत्य आहे. निवडणूक काळात प्रत्येक उमेदवार नियमित पाणीपुरवठ्याचे आश्वासन देतो. प्रत्यक्षात कोणालाच या जनतेच्या अत्यावश्यक प्रश्नांचे देणे-घेणे नाही. प्रत्येकाने आपल्यापुरत्या सुविधा उपलब्ध करून घेतल्या आहेत. त्यामुळे एक दिवस घरात नळाला आलेले पाणी आठ-आठ दिवस साठवणूक करून पुरवावे लागते.
दुसरीकडे डेंग्यूच्या आजाराचे मूळ कारण असलेल्या डासांची निर्मितीच पाण्यावर होते. नागरी वस्तीत आज मोठे उकीरडे उघड्यावर आहेत.वसूल करण्यात येणाऱ्या आरोग्य करातून गावातील प्रत्येक सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्यामध्ये डास प्रतिबंधक औषध फवारणी किमान महिन्यातून दोनदा झालीच पाहिजे. या पद्धतीच्या उपाययोजना वीस वर्षांआधीच्या कालखंडात नियमितपणे करण्यात येत होत्या. ऑईल मिश्रित औषधी दरमहा विशिष्ट तारखेला संपूर्ण गावात फवारली जायची. त्यामुळे डास निर्मितीला आळा बसायचा. त्यासाठी गावपातळीवर आवश्यक कर्मचारी प्रशासनाच्यावतीने नेमलेला राहायचा. आज ही योजनाच बासनात गुंडाळलीआहे. त्यामुळे डासांची पैदास नियंत्रित राहिली नाही. सर्वत्र चोरपावलांनी हा आजार दरदिवशी फोफावत असून, तिवसा तालुक्यातील या आजारातील बळीची संख्या बघता फारशा उपायोजनाच झालेल्या नाहीत.