खरिपाची पेरणी खोळंबली : शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत प्रभाकर भगोले चांदूररेल्वेतालुक्यातील खरिपाच्या प्रतीक्षेत असलेले शेतकरी मृग नक्षत्र कोरडे गेल्याने पेरणीसाठी पावसाची प्रतीक्षा करीत आहे. खरिपाच्या पेरणीचे मुहूर्त मृग नक्षत्राच्या सुरुवातीचा आठवड्यात करतात. परंतु गेल्या दोन वर्षांपासून मृग नक्षत्र कोरडे जात असल्याने खरिपाची पेरणीत खोळंबा निर्माण होत आहे. या चालू वर्षात आजपर्यंत पावसाची नोंद ३८.४४ मिली लिटरची आहे. मागील २०१४ च्या जून महिन्यात ५३.२४ मिली लिटरची नोंद आहे. या तुलनेने या वर्षी अगदी थोडा थोडकाच पाऊस झाला. चांदूर रेल्वे तालुक्यात ८२ टक्के जमीन कोरडवाहू व १८ टक्के शेती ओलिताखाली आहे. सिंचन व्यवस्था तालुक्यात आणल्याचा गवगवा होता. परंतु त्या सिंचन योजना अपुऱ्या असून त्या निधीअभावी भकास अवस्थेत आहेत. शेतकऱ्याला सिंचनाची व्यवस्था नसल्याने वरच्याच पावसावर विसंबून रहावे लागत असल्याने व पावसाने दडी मारल्यास पीक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे मागील दोन वर्षांपासून चालुक्यातील शेतकरी डबघाईस आला आहे.पावसाने दडी मारली असली तरी कृषी सेवा केंद्रावरही मागील वर्षीच्या तुलनेने बियाण्याची ३८ टक्के विक्री आजपर्यंत झाली आहे. मृग नक्षत्र कोरडे राहिले तर खरीप पिक पेरणी गंभीर परीणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पेरणी लांबल्याने शेतकरी वर्गात विवचनेचे वातावरण निर्माण झाले. राज्यात इतरत्र समाधानकारक पाऊस असताना तालुका मात्र ह्या पावसाच्या नोंदीला अपवाद ठरला आहे. बियाणे दरात भरमसाठ वाढ झाली असताना यावर्षी कापूस व सोयाबीन पीक पेरणीवर शेतकऱ्यांचा विशेष भर आहे. हे महागडे बियाणे आणून कोरडवाहू शेतात पेरणी केल्यास अपुऱ्या पावसाची शेतकरी वर्गात धास्ती निर्माण झाली आहे. कारण बियाणे आणि रासायनिक खतांचे भाव प्रचंड वधारल्याने दुबार पेरणीचा खर्च शेतकऱ्यांना न परवडणारा आहे. कृषी विभागाचे प्रत्येक ग्रामपातळीवर कृषी सहायकाची नेमणूक असली तरी पेरणीसाठी अपुऱ्या पावसात कोणत्या बियाण्यांची पेरणी करावी यासाठी मार्गदर्शन करण्याकरिता कृषी खाते अद्यापही प्रभावी ठरल्याचे दिसत नसल्याची शेतकरी वर्गात चर्चा सुरु आहे. बियाणे खरेदीसाठी चालविली लगबगअमरावती शहरासह जिल्ह्यात दमदार पाऊ स कोसळत असताना चांदूररेल्वे तालुक्यात मात्र, पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या आहेत. शुक्रवारी ७.३० वाजेपर्यंत शहरात पाऊ स नव्हता. शेतकऱ्यांनी शेत पेरणीसाठी सज्ज ठेवले आहे. बियाणे खरेदीसाठीसुध्दा बळीराजाने लगबग चालविली आहे. परंतु यंदा मात्र तालुक्यात दमदार पाऊ स कोसळल्याची नोंद झाली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये निरुत्साह आहे.
चांदूररेल्वे तालुक्यात मृगधारा बरसल्याच नाही
By admin | Published: June 20, 2015 12:49 AM