कृषी विभागाची मागणी : १५ दिवसांची मुदत द्याअमरावती : हवामानावर आधारित पीक विमा योजनेची अंतिम तारीख ३० जून होती. मात्र पाऊस लांबणीवर पडल्याने पेरण्याच न झाल्याने या योजनेला १५ जुलै २०१४ पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी, असा प्रस्ताव कृषी विभागाने कृषी आयुक्त कार्यालयाला पाठविला. तसेच या योजनेला मुदतवाढ द्यावी, अशी मागणी लोकप्रतिनिधींनी कृषी मंत्र्यांकडे केली होती. परंतु या योजनेला मुदतवाढ देण्यात आलेली नसल्याने अनेकांना योजनेच्या लाभापासून वंचित रहावे लागल्याचे चित्र आहे. पावसाचा लहरीपणा व नैसर्गिक आपत्ती यापासून शेती पिकांचे संरक्षण व्हावे याकरिता हवामानावर आधारित पीक विमा योजना आहे. ही योजना कर्जदार शेतकऱ्यांसाठी सक्तीची व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक स्वरुपाची होती. जिल्ह्यात खरिपाची पेरणीच झाली नसल्याने या योजनेला किमान १५ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात यावी, असा प्रस्ताव जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाने कृषी आयुक्त कार्यालयात पाठविला. मात्र मुदत वाढ देण्यात आली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. योजनेच्या अंतिम दिवशी ३० जून रोजी तलाठी संघाचे लेखणीबंद आंदोलन होते. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा काढण्यासाठी सातबारा उताऱ्यासह पेरेपत्रक व अन्य कागदपत्रे उपलब्ध होऊ शकले नाहीत. त्यामुळे या योजनेच्या लाभापासून शेतकरी वंचित राहिले आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पेरणीक्षेत्र असणाऱ्या कापूस व सोयाबीन पिकाचा या योजनेत समावेश होता. मात्र खरिपाची पेरणी झाली नसल्याने शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग नोंदविला नव्हता. योजनेला अत्यल्प प्रतिसाद असल्याने पेरणीपूर्व देखील पीक विमा काढता येतो. पीक पेरणी बदलल्यास बँकेला व कृषी विभागाला माहिती कळवावी लागणार असे स्पष्ट केले. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी गर्दी केली होती. मात्र, अंतिम दिवशी तलाठ्यांचे लेखणीबंद आंदोलन असल्याने शेकडो शेतकऱ्यांना या योजनेच्या लाभापासून वंचित रहावे लागले. (प्रतिनिधी)
पीक विमा योजनेला मुदतवाढ नाही
By admin | Published: July 03, 2014 11:19 PM