लोकमत न्यूज नेटवर्करिद्धपूर/मोर्शी : तालुक्यातील रिद्धपूर येथे देश-विदेशातून आलेल्या सुमारे ७० ते ७५ नागरिकांची तपासणी झाली नसल्याने महसूल व आरोग्य विभागाचे धाबे दणाणले आहे. पणिामीे बुधवारी रिद्धपूर येथे एकच खळबळ उडाली. दरम्यान पोलिसांनी वेढल्याने गावाला छावणीचे स्वरूप आले होते. या गंभीर बाबीची दखल घेत आमदार देवेंद्र भुयार यांनी रिद्धपूर गाठून महसूल विभाग, आरोग्य, पोलीस प्रशासन, पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाचारण केले. तसेच आमदार भुयार यांनी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना भ्रमणध्वनीवरून घटनेची माहिती दिली.कोरोना विषाणू प्रादुर्भावाने थैमान घातले असून, हजारो लोक मृत्युमुखी पडत आहेत. त्याअनुषंगाने शासन व प्रशासनाने १४ एप्रिलपर्यंत संचारबंदी, ‘लॉकडाऊन’चा निर्णय घेतला आहे. असे असताना महानुभाव पंथीयांची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र रिद्धपूर येथे दाखल झालेल्या देश-विदेशातील नागरिकांनी ‘कोरोना’ पार्श्वभूमीवर तपासणी करून घेतली अथवा नाही, ही बाब जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली नसल्याची खंत आमदार देवेंद्र भुयार यांनी व्यक्त केली. अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर येथे जिल्हाबाहेरील १०८, इतर राज्यातून २७ आणि विदेशातील एक नागरिक गावात दाखल असल्याची माहिती आहे. या प्रकारामुळे गावात दहशतीचे वातावरण आहे. आमदार भुयार हे सकाळी १० वाजतापासूनच गावात ठाण मांडून होते. त्यांनी आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून बाहेरील नागरिकांची तपासणी करून हातावर ‘होम क्वारंटाइन’ शिक्के मारण्याची प्रक्रिया राबवून घेतली. हल्ली हे नागरिक ‘होम क्वारंटाइन’ असल्याचे तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या मोर्शी ग्रामीण परिसरात एकूण १४९७ नागरिक जिल्ह्याबाहेरील दाखल झाले असून, त्यांच्यावर गठित गावनिहाय समिती लक्ष ठेवून आहे. कोरोना विषाणू रोगाने देशभरात थैमान घातले आहे. प्रशासनाकडून नाकाबंदीनंतरही देश-विदेशातून मोठ्या प्रमाणात नागरिक मोर्शी, वरूड तालुक्यांतील गावांमध्ये दाखल होणे ही चिंतनीय बाब आहे. आता हातावर शिक्के असलेल्यांवर आरोग्य विभाग , महसूल विभाग, पोलीस प्रशासनाने त्यांच्यावर करडी नजर ठेवणे काळाची गरज आहे. विशेषत: आरोग्य विभागाने काळजी घेत ग्रामस्थांच्या आरोग्याशी खेळ करू नये. ‘होम क्वारंटाइन’ असलेल्यांना घरातच थांबवावे, घराबाहेर प्रशासनाने पडू देऊ नये, असे निर्देश आमदार भुयार यांनी प्रशासनाला दिले आहेत.
रिद्धपूर येथे परप्रांतीय नागरिकांची तपासणी नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2020 5:00 AM
कोरोना विषाणू प्रादुर्भावाने थैमान घातले असून, हजारो लोक मृत्युमुखी पडत आहेत. त्याअनुषंगाने शासन व प्रशासनाने १४ एप्रिलपर्यंत संचारबंदी, ‘लॉकडाऊन’चा निर्णय घेतला आहे. असे असताना महानुभाव पंथीयांची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र रिद्धपूर येथे दाखल झालेल्या देश-विदेशातील नागरिकांनी ‘कोरोना’ पार्श्वभूमीवर तपासणी करून घेतली अथवा नाही, ही बाब जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली नसल्याची खंत आमदार देवेंद्र भुयार यांनी व्यक्त केली.
ठळक मुद्देगावाला पोलीस छावणीचे स्वरूप : देवेंद्र भुयार यांनी गाठले रिद्धपूर, प्रशासन लागले कामाला