तुरीची खरेदी, चुकारे अन् अनुदानही नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2018 01:17 AM2018-07-06T01:17:50+5:302018-07-06T01:18:10+5:30
तुरीची शासकीय खरेदी करण्याला नकार देत शासनाने तुरीला प्रतीक्विंटल एक हजाराचे अनुदान घोषित केले व आठ दिवसांत अनुदान देण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले. प्रत्यक्षात एक महिना होऊनसुद्धा घोषणेची पूर्तता अद्याप झालेली नाही. खरेदी केलेल्या तुरीचे चुकारेही मिळाले नाहीत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : तुरीची शासकीय खरेदी करण्याला नकार देत शासनाने तुरीला प्रतीक्विंटल एक हजाराचे अनुदान घोषित केले व आठ दिवसांत अनुदान देण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले. प्रत्यक्षात एक महिना होऊनसुद्धा घोषणेची पूर्तता अद्याप झालेली नाही. खरेदी केलेल्या तुरीचे चुकारेही मिळाले नाहीत. त्यामुळे ऐन पेरणीच्या काळात शेतकरी अडचणीत सापडले आहे.
शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणाविरोधात बबलू देशमुख यांनी दंड थोपाटले आहे. तत्काळ चुकारे अन् अनुदान न दिल्यास जिल्हा काँग्रेस कमिटीद्वारा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शासनाला दिला आहे.
कर्जमाफीच्या घोळात शेतकरी गारद झाला असताना एक वर्षानंतरही प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. आजही कर्जाच्या प्रतीक्षेत जिल्ह्यातील ५० ते ६० हजार शेतकरी आहे. गतवर्षी तुरीचे चांगले उत्पन्न झाले होते. त्यामुळे कर्जाची परतफेड होर्ईल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा असताना शासकीय खरेदीही बंद करण्यात आली आहे. तसेच खासगी बाजारात शेतकऱ्यांची सुमार लूट केली जात आहे. शेतकऱ्यांचा रोष घालवण्यासाठी प्रतिक्विंटल एक हजार रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा शासनाने केली आहे. येत्या आठ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा करण्याचे आश्वासन दिले. परंतु, याला एक महिन्याचा कालावधी उलटला असताना अनुदान अद्याप मिळालेले नाही, असा आरोप बबलू देशमुख यांनी केला आहे.
बोंडअळीची मदतदेखील अर्ध्याअधिक शेतकऱ्यांना मिळाला नाही. पीकविम्याची भरपाईतही ६२ हजार शेतकरी डावलले. शेतकऱ्यांची लुबाडणूक करून कंपनीचे पोट भरण्याचा गोरखधंदा चालविला आहे. शेतकऱ्यांच्याच टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार भाजप सरकारने सुरू केला असल्याचा आरोप बबलू देशमुख यांनी केला. तुरीचे अनुदान दोन दिवसांत जमा न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला.