संतोष शेंडे
टाकरखेडा संभू : भौगोलिकदृष्ट्या भिन्न असलेल्या भातकुली तालुक्यात आरोग्य सुविधादेखील तुटपुंज्याच आहेत. त्यात या सुविधा सक्षमपणे पुरविण्याकरिता पुरेशी यंत्रणा नाही. कर्मचाऱ्यांच्या अनेक जागा रिक्त असून, एका आरोग्य केंद्र, उपकेंद्र व दोन आयुर्वेदिक दवाखान्यांना इमारत नाही. काही वर्षांपासून आष्टी आरोग्य केंद्रातील ॲम्ब्युलन्स नादुरुस्त असल्याने कित्येकदा या अतिआवश्यक वाहनालाच धक्का देण्याचे काम पडते. त्यामुळे आहे त्या स्थितीत तालुक्यातील आरोग्य यंत्रणेला काम करताना तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे चित्र तालुक्यात पाहावयास मिळत आहे.
भातकुली तालुक्याची रचनाच मुळात विचित्र आहे. तालुक्याचे मुख्यालय एका टोकावर असून, बहुतांश शासकीय कार्यालये अमरावतीला आहेत. अमरावतीहून १५ ते २५ किमीच्या अंतरावर असलेल्या या तालुक्यात खोलापूर, गणोरी व आष्टी येथे प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. याअंतर्गत १८ आरोग्य उपकेंद्रे आहेत. याशिवाय धामोरी, विर्शी, सायत, कवठा बहाळे, हातुर्णा, टाकरखेडा संभू व रामा येथे स्वतंत्र आयुर्वेदिक दवाखानेदेखील आहेत. याशिवाय भातकुली येथे ग्रामीण रुग्णालय आहे. आष्टी येथे १९, तर खोलापूर येथे १५ बेडची सुविधा आहे. गणोरी आरोग्य केंद्राला स्वत:ची इमारतच नसल्याने तेथे बेड नाही. याशिवाय धामोरी आणि सायत ही दोन्ही आयुर्वेदिक दवाखाने उपकेंद्रात आहेत. प्रत्येक गावात आरोग्य सेवक असणे गरजेचे आहे. परंतु, वाठोडा व रामा येथे हे पद रिक्त आहे. खोलापूर आरोग्य केंद्रात आरोग्य सेवक, आरोग्य सेविका व एका वैद्यकीय अधिकाऱ्याचे पद रिक्त आहे. परिचरदेखील नाही. आष्टीत दोन आरोग्य सेवक, फार्मासिस्ट नाही. गणोरी येथेदेखील तीच स्थिती आहे.
तालुक्यात चार रुग्णवाहिका असून, त्याची मुदत संपली आहे. यामुळेच आष्टी आरोग्य केंद्रात असलेली रुग्णवाहिका नादुरुस्त आहे. रुग्ण वाहून नेत असताना ती अनेकदा मध्येच बंद पडली. तालुक्याचा व्याप पाहता, सुविधा आहेत, आता यंत्रणा सक्षम असणे गरजेचे आहे. ती नसल्याने बहुतांश रुग्ण अमरावतीत खासगी, शासकीय रुग्णालयात उपचार घेतात.
बॉक्स
साऊरच्या आयुर्वेदिक दावाखान्याची इमारत शिकस्त
साऊर येथे असलेला आयुर्वेदिक दवाखान्याची दैनावस्था झाली आहे. तेथील भिंतींना भेगा पडल्या असून, पावसाळ्यात दवाखान्याच्या छताला गळती सुरू झाली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची गैरसाय होत आहे.
बॉक्स
तालुक्यात सर्वच आरोग्य व उपकेंद्रांमध्ये आलबेल नाही. रिक्त जागा असल्याने प्रभावीपणे काम करता येत नाही. तरीही तालुक्यात कोरोनावर सुरुवातीपासूनच नियंत्रण आहे. याशिवाय लसीकरण मोहीमदेखील जोरात सुरू आहे.
- डॉ. अक्षय निकोसे, तालुका वैद्यकीय अधिकारी
===Photopath===
200621\img-20210619-wa0010.jpg
===Caption===
साऊर येथील आयुर्वेदिक दवाखान्याची शिकस्त इमारत