महापौरांच्या प्रभागात मूलभूत सुविधांची वानवा : हरिशांती कॉलनी, खंडेलवालनगर, सीतारामदासबाबा नगरअमरावती : शहराची वाढती लोकसंख्या पाहता दाट वस्तीतून विरळ वस्तीकडे नागरिक आगेकूच करीत आहेत. मात्र नवीन वस्त्यांना पाहिजे तशा मूलभूत सुविधा मिळत नाही. शहराच्या शेवट वसलेल्या या वस्त्यांमधील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न 'लोकमत आपल्या दारी' या उपक्रमांतर्गत शनिवारी घेण्यात आला.लोकमत चमुने मध्यवस्तीपासून ७ किमी अंतरावरीला खंडेलवाल ले-आऊटमधील संत सीतारामदास बाबा नगरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. परिसरात व्यवस्थित रस्ते नाहीत, पिण्याच्या पाण्याची योग्य सोय नाही तसेच सांडपाण्याची विल्हेवाट योग्यरीत्या लागत नाही. विशेष म्हणजे हा नेमाणी प्रभाग क्रमांक ३९ हा महापौरांच्या देखरेखित असतानाही नागरिक मुलभुत सुविधापासून वंचीत आहे. बडनेरानजीकच्या संत सीताराम बाबा नगर हे २००५ मध्ये वसलेले आहे. विरळ वस्तीचा या भाग जवळपास ७० कुटुंबीयांचे ४०० सदस्य वास्तव्यास आहते. मध्यवर्गीय नागरिकांच्या वस्त्या वाढत आहेत, मात्र, विकासांच्या व मूलभूत सुविधांपासून आजही हा भाग वंचित असल्याची ओरड नागरिकांमध्ये होत आहे. विशेष म्हणजे हा प्रभाग महापौरांचा आहे, त्यांनी लक्ष देऊन नागरिकांच्या समस्यां जाणून घ्याव्यात, अशी एकमुखी प्रतिक्रिया नागरिकांची आहे. मात्र, महापौर केवळ विकास कामांच्या उद्घाटनाप्रसंगीच प्रभागात येतात, असा आरोपही नागरिकांचा आहे. साईनगरातून अकोलीकडे जाणाऱ्या मार्गावरून संत सीतारामदास बाबा नगरात जाण्यासाठी रस्ता आहे. तेथूनच पुढील परिसरातील रस्त्यांची दुर्दशा बघायला मिळते. या नगरात जाण्यासाठी बडनेरामार्गावरून रस्ता आहे, मात्र, एकेरी वाहन जाईल इतकाच तो रस्ता आहे, त्यातच त्याच रस्त्यावर एक छोटासा पूल आहे. पुलाला कठडे नसल्यामुळे अपघाताची शक्यता आहे. रस्त्याचे खस्ता हाल पाहता रहिवाशांना घरापर्यंत जाणे कठीण झाले आहे. पावसाळ्यात नागरिकांना या मार्गावरून जाताना नाहक त्रास सहन करावा लागतो. या परिसरापासून कोसोदूर रुग्णालये आहेत. त्यामुळे आपात्कालीन स्थिती नागरिकांची चांगलीच गैरसोय होत आहे. परिसरात कचरा कन्टेंनर नसल्यामुळे ढिगारे बनले आहे. काही घराना नाल्या आहेत, तर काहीना नाल्या सुध्दा नाहीत, त्यातच नाल्यांमध्ये स्वच्छता होत नसल्यामुळे सांडपाण्यांनी नाल्या तुंबल्या आहेत. अनेकदा तर नाल्यातील सांडपाणी नागरिकांच्या घरात सुध्दा घुसल्याची ओरड नागरिकांनी केली आहे. सांडपाणी व कचऱ्यांची विल्हेवाट योग्यरित्या होत नसल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी)
रस्ते, नळाचे पाणी नाही; नाल्याही तुंबल्या!
By admin | Published: May 08, 2016 12:09 AM