अमरावती : या देशाचे दोन महान सुपुत्र राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व वैराग्यमूर्ती गाडगेबाबा यांची कर्मभूमी असलेला हा तिवसा मतदारसंघ. या दोन्ही महापुरूषांची नावे शासनाच्या थोरपुरूष व राष्ट्रपुरूष यांच्या यादीत नाही. शासन म्हणते, यादीत २८ महापुरूषांची नावे असल्यामुळे यामध्ये अधिक वाढ करता येत नाही व शासकीय कार्यालयांत या दोन्ही महापुरूषांची छायाचित्र लावण्यास जागा नाही. शासनाला या महान संतांच्या कार्याचा विसर पडला आहे. या दोन्ही महापुरूषांची नावे शासनाच्या थोरपुरूषांच्या यादीत समावेश करून प्रत्येक शासकीय कार्यालयात लावण्यात येणार नाही तोवर आपण स्वस्थ बसणार नाही, या मागणीसाठी प्रसंगी रस्त्यावर उतरून संघर्ष करू, असे तिवसा विधानसभा मतदारसंघाच्या भाजपाच्या उमेदवार निवेदिता चौधरी यांनी सांगितले.राष्ट्रसंतांचा पुण्यतिथी महोत्सव सध्या गुरूकुंज मोझरी येथे सुरू आहे. शनिवारी त्यांनी पहाटे राष्ट्रसंतांच्या महासमाधीचे दर्शन घेऊन प्रचाराचा शुभारंभ केला. देशाच्या सीमेवर जाऊन भजनाद्वारे जनजागृती करणारे राष्ट्रसंत व अंधश्रद्धा मोडीस काढून स्वच्छतेचा मूलमंत्र देणारे गाडगे महाराज यांच्या कार्याचा गौरव व्हावा यासाठी प्रयत्न करणार. त्यांनी शनिवारी खोलापूर, वाठोडा शुक्लेश्वर, पूर्णानगर भागात प्रचार रॅली काढली. यावेळी त्यांच्या समवेत बबनराव गोमासे, आनंद राठी, राजेश अग्रवाल, सुनील मानकर, गणेश कडू, मोहन तळकीत, दिनेश तायडे, राजेश बंड, अजय सोळंके, भैयासाहेब देशमुख, सचिन इंगोले, मनोज इंगोले, अजय बोरकर आदी उपस्थित होते.
थोर पुरूषांच्या यादीत राष्ट्रसंत हवेच
By admin | Published: October 11, 2014 10:57 PM