फोटो - परतवाडा २८ ओ
परतवाडा मुख्य केंद्र, वनाधिकार म्हणतात - तपास सुरूच आहे, चोहीकडे नाके तरी लाखोंची तस्करी कशी?
लोकमत विशेष
परतवाडा : दहा दिवसांचा कालावधी लोटूनसुद्धा परतवाडा पोलिसांनी पकडलेल्या सागवानाचा सुगावा अजूनही वनविभागाला लावता आलेला नाही. मेळघाटसह इतर मार्गांवर वनविभागाचे नाके असूनसुद्धा सागवान तस्करी होते कशी, परतवाडा कोट्यवधीच्या सागवान तस्करीचे केंद्र आहे का, यात कोणाचे साटेलोटे, अशा अनेक प्रश्नांची उकल अलीकडच्या कारवाया पाहता होणे गरजेचे ठरले आहे.
परतवाडा पोलिसांनी दोन लाख रुपयांचे सागवान परतवाडा ते शिरजगाव मार्गावर एमएच ०४ सीए ८१८७ क्रमांकाच्या ट्रकमधून १७ ऑगस्टच्या मध्यरात्री पकडले. ट्रकचालकाला परतवाडा शहरातील रेस्ट हाऊस चौकात सापळा रचून अटकाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो पळून गेला. पोलिसांचा संशय आणि गोपनीय माहिती अचूक होती. त्यामुळे पाठलाग करीत ट्रक व सागवान पकडले गेले. मात्र, चालक पळून जाण्यात यशस्वी झाला. दहा दिवसांपूर्वी परतवाडा पोलिसांनी संपूर्ण तपास परतवाडा वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप भड आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडे दिला आहे. परतवाडा शहरात मोठ्या प्रमाणात सागवान तस्करी होत असल्याच्या अलीकडच्या घटनांनी आता पुढे येऊ लागले आहे.
बॉक्स
ट्रक कुणाचा? आरटीओला पत्र
सागवान तस्करीसाठी वापरलेला ट्रक कुणाचा, यासदर्भात परतवाडा वनविभागाच्यावतीने आरटीओ कार्यालयाला पत्र पाठवून सविस्तर माहिती मागविण्यात आली आहे. त्यानंतर ट्रकसंदर्भात माहिती व त्यातील सागवान कोठून आणले, कुणाचे आहे, आरोपी कोण, या बाबींचा खुलासा होणार आहे.
बॉक्स
नाके असताना तस्करी कशी?
परतवाडा शहराला लागून मेळघाटचे जंगल आहे, तर काही ठिकाणी मध्यप्रदेशच्या जंगलाचा भाग येतो. परंतु मेळघाटातून येणाऱ्या सर्व मार्गांवर बिहाली, धामणगाव गढी, खोंगडा, बोराळा, बहिरम, डोमा, सेमाडोह, हरिसाल, भोकरबर्डी, ढाकना, भांडुम, जारिदा अशा जवळपास सर्वच मार्गावर वन आणि व्याघ्र प्रकल्पाचे नाके आहेत. तरीसुद्धा मध्यरात्री परतवाडा शहरात ट्रकमध्ये सागवान भरून येत असल्याने तस्करांचे साटेलोटे असल्याच्या संशयाला बळ प्राप्त झाले आहे.
कोट
परतवाडा पोलिसांनी पकडलेल्या सागवानसंदर्भात तपास सुरू आहे. ट्रक कुणाचा, यासंदर्भात आरटीओना पत्र देण्यात आले आहे.
- प्रदीप भड, वनपरिक्षेत्र अधिकारी, परतवाडा
कोट
ट्रकसह सागवान पकडल्यानंतर संबंधित तपास वनविभागाकडे देण्यात आला. पुढील तपास त्यांच्या स्तरावर सुरू आहे.
- सदानंद मानकर, ठाणेदार, परतवाडा