चांदूररेल्वे : तालुक्यातील घुईखेड शेत शिवारात रेती तस्करांनी धुमाकूळ घालून बेंबळा धरण बुडीत क्षेत्रात अवैधरीत्या साठवून ठेवलेल्या रेतीचा लिलाव करण्याचे आदेश बाभुळगावच्या तहसीलदारांनी काढले असून या रेतीचा लिलाव १९ जानेवारीला होणार आहे. यवतमाळ व अमरावती जिल्ह्याच्या सीमेवरील घुईखेड व पिंपळखुटा शेतशिवरात रेती तस्करांनी धुमाकूळ घातला होता. तस्करांनी घुईखेड व पिंपळखुटा (जि. यवतमाळ) परिसरातील नदी व नाल्यातून शेकडो ब्रास रेतीचे अवैध उत्खनन करून बेंबळा धरण बुडीत क्षेत्रात साठवून ठेवले होते. याबाबत माजी ग्रामपंचायत सदस्य गजानन गिरी, शेख ताजमहंमद भाई, शंकर भोयर यांनी वारंवार तक्रार करूनही बाभुळगावच्या तहसीलदाराने कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे तक्रारकर्त्यांनी थेट यवतमाळचे एसडीओ टापरे यांच्याकडे तक्रार केली होती. त्यांची त्वरित दखल घेत एसडीओ टापरे यांनी पिंपळखुटा क्षेत्रातील बेंबळा धरण बुडीत क्षेत्रातील गट क्र. ३६ मधील शंकर महादेव जाधव यांच्या शेतातील ३० व २० ब्रास व गट नं. २२ मधील बेनाम १५ ब्रास व गट क्र. ८७ मधील ८ ब्रास रेती साठ्यावर जप्तीची कारवाई केली. (तालुका प्रतिनिधी)
घुईखेड सीमेवरील अवैध रेतीसाठ्यांचा लिलाव होणार
By admin | Published: January 18, 2015 10:28 PM