गणेश वासनिक
अमरावती : बुलडाणा जिल्ह्यातील लोणार येथील खाऱ्या पाण्याच्या एकमेव सरोवरातील जैवविविधता संवर्धनासाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठामार्फत संशोधन केले जाणार आहे. राज्य शासनाच्या राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाने विद्यापीठाला ही जबाबदारी दिली. त्यासाठी प्रयोगशाळा व वेधशाळा उभारली जाणार आहे. त्याची रूपरेषा अणुवैज्ञानिक अनिल काकोडकर यांच्या उपस्थितीत २७ डिसेंबरला येथे आयोजित बैठकीत ठरणार आहे.
लोणार हे बेसॉल्ट खडकातील एकमेव विवर आहे. थर्मोल्युमिनेसेन्स तंत्रज्ञानावरून ते ५२ हजार वर्षांपासून अस्तित्वात असल्याचे मानले जाते. लोणार सरोवरचे जतन व संवर्धनासाठी १.८ चौरस किमी परिसरातील लोणार विवर (क्रेटर) हे वन्यजीव अभयारण्य घोषितकरण्यात आले आहे. भारतीय अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष पद्मविभूषण अनिल काकोडकर यांनी लोणार सरोवरचे वैज्ञानिकदृष्ट्या महत्त्व बघता हा वारसा जतन करण्याचा संकल्प केला आहे.