ते आले, मस्तपैकी जेवण केले अन् निघून गेले! प्रफुल्ल पटेलांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2023 12:03 PM2023-09-04T12:03:13+5:302023-09-04T12:03:28+5:30
अजित पवार गटाची अमरावतीत पहिली सभा हाउसफुल्ल
अमरावती : ते आले, मस्तपैकी जेवण केले आणि निघून गेले. नव्याने जुळलेल्या विरोधकांच्या आघाडीचे पाटण्यातील पहिल्या बैठकीचे हे चित्र पाहिले आणि विकासाच्या मुद्द्यावर अजित पवार यांच्या नेतृत्वात सत्तेत सहभागी झालो. मोदींना थांबविण्यासाठी तयार झालेली विरोधकांच्या आघाडीचे नाव हे इंडिया नसून ते ‘आय डॉट एन डॉट डी डॉट आय डॉट ए डॉट’ असे आहे. यात सहभागी पक्षांमध्ये ताळमेळ नसल्याची टीका राष्ट्रवादी कॉँग्रेस (अजित पवार गट) चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केली.
राष्ट्रवादी (अजित पवार गट) ची रविवारी संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे नवचेतना महासभा पार पडली. राष्ट्रवादीचा एक गट राज्याच्या शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळात सहभागी झाल्यानंतर पहिल्यांदाच या सभेचे आयोजन वरिष्ठ नेते संजय खोडके यांनी केले होते. सभेला खा. प्रफुल्ल पटेल यांच्यासह आ. अमोल मिटकरी, युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष सुरेश चव्हाण, महिला नेत्या सुरेखा ठाकरे, वसंत घुईखेडकर यांच्यासह विभागातील नेतेमंडळी उपस्थित होती. यावेळी प्रफुल्ल पटेल यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, विरोधकांनी स्थापन केलेल्या आघाडीच्या पाटणा येथील पहिल्या बैठकीला शरद पवार यांच्यासोबत गेलो होतो. ते आले, मस्तपैकी जेवण केले आणि निघून गेले. त्याच वेळी ही आघाडी जुळणारी नाही, हे लक्षात आले होते. मुंबईच्या तिसऱ्या बैठकीत 'इंडिया'चा लोगो ठरविण्यावरही त्यांचे एकमत होऊ न शकल्याने लोगोचे लोकार्पण झाले नाही. दुसरीकडे देशातील जनतेला विश्वास असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे जगात देशाचा सन्मान वाढल्याचे खा. पटेल म्हणाले.
विकासाची ब्ल्यू प्रिंट गरजेची : संजय खोडके
विकासाचे प्रश्न घेऊन आता आपल्याला समोर जायचे असून पार्टी बळकट करायची आहे. याासाठी विदर्भाच्या माणसाला विदर्भातील माणसावर विश्वास दाखवावा लागेल. विदर्भाच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट तसेच रोडमॅप तयार करावे लागेल, असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके म्हणाले.
पवारांच्या कर्जमाफीपेक्षा मोदींची मदत जास्त
२००९ मध्ये शरद पवार कृषिमंत्री असताना देशातील सर्वात मोठी ७२ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी झाल्याचा गवगवा करण्यात आला. परंतु, नरेंद्र मोदी कृषी सन्मान योजनेतून प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात सहा हजार रुपये जमा करीत आहेत. त्यांची ही मदत पवारांच्या कर्जमाफीपेक्षा अनेक पटींनी मोठी असल्याचे सांगत प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांवरही निशाणा साधला.
अजित पवारांमुळे मोकळा श्वास : अमोल मिटकरी
अजित पवारांनी सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यात सर्वाधिक ट्रोल मला केले गेले. परंतु, राजकारणाचा सर्वाधिक अभ्यास त्यांचा आहे. यामुळे त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय झाला अन् खऱ्या अर्थाने पक्षाने मोकळा श्वास घेतला, असे विधान आमदार अमोल मिटकरी यांनी यावेळी केली.