फोटो -
वरूड/जरूड - भाजप महविकास आघाडीचे सरकार पडणार नाही. त्यांच्या कर्मानेच ते पडेल. अनेक पक्षातील नाराज लोक रात्रीच्या अंधारात येऊन भेटतात आणि दिवसाच्या उजेडात प्रवेश घेतात. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी नगर परिषद निवडणुकीत जोमाने कामाला लागावे, विजय आपलाच आहे, असे प्रतिपादन भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले.
वरूड येथील आपल्या नियोजित दौऱ्यात चंद्रकांत पाटील यांनी भाजप कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी खा. रामदास तडस, आ. प्रताप अडसड, आ. उपेंद्र कोठेकर, जिल्हाध्यक्ष निवेदिता दिघडेे (चौधरी) व डॉ. अनिल बोंडे उपस्थित होते. आगामी नगरपरिषदांच्या निवडणुकीमध्ये पूर्ण ताकदीनिशी काम करून तालुक्यासह संपूर्ण विधानसभा मतदारसंघातील नगर परिषदांवर भाजपाचा झेंडा फडकविण्याकरिता सर्व कार्यकर्त्यांनी कार्य करावे. महाविकास आघाडी तोडण्याचा भाजपाकडून प्रयत्न केल्याचा आरोप होत आहे. मात्र, आम्हाला कोणतेच लोक फोडायची गरज नाही. नाराज लोक रात्रीच्या अंधारात येऊन भेटतात आणि दिवसाच्या उजेडात प्रवेश घेतात, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. वरूड विकास आघाडीचे संस्थापक तथा नगरसेवक उमेश यावलकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी यावेळी भाजपमध्ये प्रवेश घेतला.
भाजपने शोधला नवा चेहरा? वरूड विकास आघाडीचे संस्थापक उमेश यावलकर यांनी भाजप मध्ये प्रवेशाच्या बातमी मिळताच वरूड-मोर्शी मतदारसंघात पक्षाला आमदारकीसाठी नवा चेहरा मिळाला, अशा चर्चेला हवा मिळाली. उमेश यावलकर यांचे सर्वांसोबत जिव्हाळ्याचे संबंध असल्याने माजी आ.अनिल बोंडे यांनी यावलकर यांचा भाजप प्रवेश करून घेऊन स्वतच्या पायावर धोंडा पाडून घेतला, अशी खमंग चर्चा सोशल मीडियावर दिवसभर सुरू होती.