अमरावती : एक दीड लाख रुपये घेऊन ते खेळण्यास बसले, बंद घरात उशिरा रात्री तो खेळ अधिकच रंगतदार बनला. मात्र, हाय रे देवा. कुठून काय पोलीस पोहोचलेत, अन् जुगाऱ्यांना पळता भूई थोडी झाली. दोन चार नव्हे तर तब्बल २६ जुगारी पोलिसांच्या हाती पडले. पोलिसांनी त्यांना हिसका दाखविलाच. सोबतच जुगाऱ्यांकडून १ लाख ५५ हजार ४० रुपये रोख, १९ मोबाइल व ११ दुचाकी असा एकूण ९ लाख १ हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
स्थानिक गुन्हे शाखा व रहिमापूर पोलिसांच्या संयुक्त पथकाने ६ जून रोजी रात्री अंजनगाव सुर्जी तालुक्यातील मुऱ्हा देवी येथील एका घरात सुरू असलेल्या जुगारावर धाड टाकली. मुऱ्हा देवी येथे मोमीन शेख कदीर शेख याने आपल्या घरी मोठ्या प्रमाणात जुगार भरविल्याची माहिती गस्तीवर असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारावर पथकाने रहिमापूर पोलिसांना सोबत घेऊन या जुगारावर धाड टाकली.
हे जुगारी ताब्यात
या कारवाईत मोमीन शेख, श्रीकृष्ण नवले (दोघेही रा. मुऱ्हा देवी), राहुल खानापुरे, गोपाल अस्वार, उमेश ईखार, मुक्तार अली, भूषण देशमुख, नीलेश माकोडे, अरुण कुकडे, विनोद धमाले, रुपेश मोरे व प्रशांत मुरकुटे( सर्व रा. अंजनगाव सुर्जी), उमेश थोरात व दिनेश गायकवाड, मोहम्मद एजाज व फईमोद्दीन शरिफोद्दीन (चौघेही रा. कसबेगव्हाण), गजानन गाळे (हंतोडा), सतीश शेळके व अंकुश शेळके (येवदा), दिनेश लव्हाळे व शेख बुन्हान शेख कादर (दोघेही रा. कापुसतळणी), नंदकिशोर करंडे (रामगाव), सुमित खंडेकर (हसनापूर), देविदास पातोंड (वनोजा), निवृत्ती मिसाळ (हयापूर), अनिल सदार (चिंचोली बु) यांना ताब्यात घेण्यात आले. तर मोहम्मद साबीर हा फरार झाला.
यांनी केली कारवाई
पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तपन कोल्हे यांच्या नेतृत्वात रहिमापूरचे ठाणेदार नीलेश देशमुख, पोलीस उपनिरीक्षक संजय शिंदे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक त्र्यंबक मनोहर, सुनील महात्मे, नीलेश डांगोरे, अमोल केंद्रे, दिनेश राठोड, बाबुराव लुटे, गजानन शेरे यांनी ही दमदार कारवाई केली.