वरूड : स्थानिक जायंट्स चौक परिसरातील एका दुकानासमोरून १६ जुलैला अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून नेली होती. वरूड पोलिसांनी दोन महिन्यानंतर मध्यप्रदेशातील आरोपीला अटक करून दुचाकी जप्त केली.
पोलीस सूत्रांनुसार, नवीन किशोर पंडागरे (२६, रा. जामठी कला, ता. आठनेर, जि. बैतुल) असे आरोपीचे नाव आहे. त्याने १६ जुलैला स्थानिक जायंट्स चौक परिसरातून योगेश घोडसे (रा. जरूड) यांची एमएच २७ सीडी ४८१६ क्रमांकाची दुचाकी अज्ञात आरोपीने लंपास केली. पोलिसांना मध्य प्रदेशातील जामठी (कला) येथे आरोपी असल्याची माहिती मिळाली. यावरून पोलिसांचे पथक मध्य प्रदेशात गेले. त्यांनी नवीनकडून दुचाकी ताब्यात घेऊन त्याला अटक केली. त्याच्याकडून दुचाकीचोरीचे आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली. प्रकरणाचा तपास ठाणेदार प्रदीप चौगावकर यांच्या मार्गदर्शनात एपीआय महागरे, जमादार सुनील आकोलकर, मनोज कळसकर, प्रशांत पोकळे, परमेश्वर काकड करीत आहेत.