अमरावती : नोव्हेंबरच्या तिसऱ्या व चौथ्या आठवड्यात आशियाड काॅलनी व प्रिया टाऊनशिपमध्ये चाकूचा धाक दाखवून चेनस्नॅचिंग करण्यात आली. तर, ८ डिसेंबरच्या घटनेत चाकू सोडून हेल्मेट वापरण्यात आले. त्यामुळे चेनस्नॅचरने पद्धत व लोकेशन बदलविल्याचे प्राथमिक निरीक्षण पोलिसांनी नोंदविले आहे. बुधवारी रात्री ७.३० ते ८ च्या सुमारास चेनस्नॅचिंगची वर्षातील १४ वी घटना घडली.
गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक महिला ८ डिसेंबर रोजी रात्री नातेवाईक व मैत्रिणीसह एका स्वागत समारंभाला जात असताना रात्री ७.३० ते ८ च्या सुमारास फ्रेंड्स कॉलनीतील गणपती मंदिराजवळ दुचाकीहून मागून आलेल्या व्यक्तीने त्यांच्या गळ्यातील ७५ हजार रुपये किमतीचे १५ ग्रॅमचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढला.
त्याने काळ्या रंगाची टीशर्ट व हेल्मेट परिधान केलेले होते. महिलेने आरडाओरड केल्याने मंदिरालगतच्या बाकड्यावर बसलेल्या मुलांनी त्या बाईकस्वाराचा पाठलागदेखील केला. मात्र, तो रफुचक्कर झाला. याप्रकरणी रात्री ११.४३ च्या सुमारास अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल केला. ५ डिसेंबर रोजीदेखील एका हेल्मेटधारक दुचाकीस्वाराने चेनस्नॅचिंगचा अयशस्वी प्रयत्न केला होता.
पोलीस आयुक्त घटनास्थळी
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी तातडीने घटनास्थळ गाठले. डीसीपी एम.एम. मकानदार, एसीपी पूनम पाटील, गुन्हे शाखाप्रमुख अर्जुन ठोसरे, गाडगेनगरचे ठाणेदार आसाराम चोरमले यांच्यासह त्यांनी घटनास्थळावरील नागरिकांशी संवाद साधला. तर यंत्रणेला दिशानिर्देश देऊन नागरिकांना देखील सजगतेचे आवाहन केले. त्यांनी ॲन्टी चेनस्नॅचिंग स्कॉडचीदेखील कानउघडणी केल्याची माहिती आहे.