अमरावती : बऱ्हाणपूरकडे जाणाऱ्या मुख्य महामार्गावर असलेल्या कळमखार गावातील देशी दारू दुकानात चोरी करून एलसीडी टीव्ही व रोकड लंपास करण्यात आली. दोन चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. या चोरट्यांनी पांढऱ्या रंगाची पीपीई किटसदृश रेनकोट व मास्क घातल्याचे निदर्शनास येत आहे.
चोरीच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील. चोरटे वेगवेगळ्या शकला वापरून चोरी करतात. मात्र, यावेळी चोरट्यांनी चोरीसाठी चक्क पीपीई किटचाच आधार घेतल्याचे समोर आले आहे. चोरट्यांनी पीपीई किट घालून थेट दारूच्या दुकानावर धावा केला. हा सर्व प्रकार येथील सीसीटीव्हीत कैद झाला आहे. पीपीई किटचा असा वापर पाहून लोकही चक्रावले आहेत.
कळमखार गावात मुख्य महामार्गावर विशाल लोभीलाल मालवीय यांच्या मालकीचे देशी दारू दुकान आहे, रविवारी ‘ड्राय डे’ असल्याने दुकान बंद होते. सोमवारी सकाळी ९ वाजता व्यवस्थापक रामू भीलावेकर हे दुकान उघडण्यासाठी गेले त्यावेळी टाळे तुटलेले आढळले. ही माहिती मिळताच मालवीय यांनी दुकान गाठले. दुकानातील साहित्य अस्ताव्यस्त होते. गल्ल्यातील रोकड लंपास करण्यात आली.
सीसीटीव्हीचा डीव्हीआर अस्तव्यस्त करून एलसीडी टीव्ही चोरून नेल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. रात्री १ च्या सुमारास चोरटे या दुकानात शिरल्याचे रेकॉर्डिंग आहे. चोरटे दोनपेक्षा जास्त असू शकतात, असा पोलिसांचा कयास आहे. अंदाजे एक लाख रुपयांची चोरी झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. विशाल मालवीय यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला. पोलीस निरीक्षक सुरेंद्र बेलखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नितीन चुलपार व त्यांचे पथक पुढील तपास करीत आहेत.