अमरावती : जालना येथून प्रवास करत एकाच रात्री दर्यापुरातील तीन दुकाने फोडणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले. गजानन सोपानराव शिंगाडे (३५, रा. पाचन वडगाव, ता. जालना) व राहुल तुलजासिंग राजपूत (२२, रा. मंगल बाजार, लोधी मोहल्ला, जालना) अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यांनी दर्यापूरसह अकोला व यवतमाळ जिल्ह्यात केलेल्या चोरीच्या नऊ गुन्ह्यांची कबुली दिली आहे.
२० जुलै रोजी रात्रीच्या सुमारास संतोष शिंदे यांच्या देशी दारू दुकानाचे कुलूप तोडून गल्ल्यातील ६० हजार रुपये व डीव्हीआर चोरीला गेला होता. त्याच रात्री गजानन टोळे यांच्या टोळे जिनिंगमधून चोरांनी ६८ हजार रुपये व डीव्हीआर, वैभव माळोकार यांच्या ज्वेलर्स दुकानातून १०० ग्रॅम चांदीच्या मूर्ती व १०० ग्रॅम चांदीच्या तोरड्या असा एकूण १८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. दर्यापूर शहरात एकाच दिवशी झालेल्या या तीनही चोरीप्रकरणी दर्यापूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास आरंभला होता.
गुन्ह्याचा तपास करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अमरावती, अकोला, यवतमाळ जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण केले. त्याआधारे ते गुन्हेगार जालना परिसरातील असू शकतात, अशी माहिती हाती आली. त्यावरून एक पथक जालना येथे पोहोचले. गजानन शिंगाडे याला ताब्यात घेऊन गुन्ह्याबाबत विचारणा केली असता, त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, नंतर दर्यापूर येथे घडलेल्या वरील तिन्ही गुन्ह्यांची कबुली दिली.
दोन चारचाकी वाहने चोरली
राहुल राजपूत व अन्य तीन साथीदारांसह गजानन हा चारचाकी वाहनाने जालना येथून यवतमाळात आले. तेथील करंजी परिसरातून त्यांनी एक चारचाकी वाहन चोरले. मारेगाव येथील दोन दुकानांत चोरी केली. त्यानंतर अमरावती जिल्ह्यात येऊन ते येथील एका गावातील चारचाकी वाहन घेऊन गेले. यवतमाळ जिल्ह्यातून चोरलेली पिकअप गाडी थोड्या अंतरावर टाकून तेथून अन्य एका गाडीने दर्यापूर येथे जाऊन तेथे तीन दुकाने फोडली.
अकोला जिल्ह्यात चोरीदर्यापुरातील तीन आस्थापना फोडून आरोपींनी अकोला जिल्ह्यातील आकोट शहराबाहेरील गॅस गोडावूनमध्ये चोरी केली. सोबत असलेले चारचाकी वाहन तेथे सोडून तेथून एक लाल रंगाची आणखी एक चारचाकी चोरून आरोपी जालना येथे परतले, अशा माहितीवरून राहुल राजपूत याला जालना येथून ताब्यात घेण्यात आले. आरोपींच्या ताब्यातून गुन्ह्यात दुकाने फोडण्यासाठी वापरलेली एक लोखंडी टॉमी व एक पाना जप्त करण्यात आला. त्यांच्या अटकेमुळे दर्यापूर ठाण्यातील तीन व खोलापूर ठाण्यात एक असे चार गुन्हे, तसेच यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव, वणी व पांढरकवडा ठाण्यातील प्रत्येकी एक गुन्हा व अकोला जिल्ह्यातील अकोट शहर येथील दोन गुन्हे अशा एकूण नऊ गुन्ह्यांची कबुली दिली.