शेंदूरजनाघाट (अमरावती) : वरूड वनपरिक्षेत्रातील वाई परिसरात आठ दिवसांत १६ माकडांचा पाण्याअभावी मृत्यू झाला. जंगलातील नैसर्गिक-कृत्रिम पाणवठ्यांना पडलेली कोरड आणि गावागावांतील तीव्र पाणीटंचाई यामुळे त्या माकडांना पाण्यावाचून जीव गमवावा लागल्याचा प्रकार दोन दिवसांपूर्वी उघड झाला.
वाई साठवण तलावालगतच ही घटना घडल्याने अन्य वन्यप्राण्यांचा पाण्याअभावी जीव जाऊ नये, यासाठी वनविभागाने कृत्रिम पाणवठ्यात पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी वन्यजीवप्रेमींनी केली आहे. वन्यजिवांची तहान भागविण्याकरिता कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले. मात्र, त्या पाणवठ्यात टाकण्याकरिता पाणी मिळत नाही. या जंगलात माकडे, मोर, निलगाय, वाघ, बिबटासह अन्य वन्यजीव वास्तव्य आहेत.
१५ दिवसांपासून तापमानात मोठी वाढ झाल्याने वन्यप्राण्यांना उष्माघातासह तीव्र पाणीटंचाईचा फटका बसला. पाणी न मिळाल्याने व्याकूळ झालेल्या १६ ते १७ माकडांचा दुर्देवी मृत्यू झाला. वनाधिकारी प्रशांत लांबाडे यांनी या घटनेला दुजोरा दिला. वनरक्षक विशाल अंबागडे व अन्य वनकर्मचाºयांनी मृत माकडांचा पंचनामा केला. पशुवैद्यकीय अधिकारी चेडे यांनी शवविच्छेदन केले.