लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : हयात असताना आपण आपल्याच तेरवीसाठी आप्तांना, मित्रांना बोलावले, तर खरे. घरूनही किंचितसा विरोध होता. त्यामुळे कुणी येईल का, आले तरी त्यांची प्रतिक्रिया काय असेल, अशा अनिश्चिततेच्या हिंदोळ्यावर झुलत असतानाच आप्त व मित्रांनी सुखद धक्का दिला. अपेक्षेपेक्षा अधिक गोतावळा जमला. तेथेच आपली आयडियाची कल्पना झकास जमली. मृत्यूपूर्व तेरवीचे सुग्रास जेवण करून सर्वांनी मला दीर्घायू होण्याच्या सदिच्छा दिल्या. मी भरून पावलो....
या सद्गदित भावना आहेत, निवृत्त पोलीस अधिकारी सुखदेव डबरासे यांच्या. मृत्यूपूर्व तेरवी, त्या कार्यक्रमाच्या पत्रिका आप्तांना पाठवून त्यांना निमंत्रण धाडल्याने येथील निवृत्त राखीव पोलीस उपनिरीक्षक सुखदेव डबरासे चर्चेतील चेहरा ठरले होते. ३१ डिसेंबर रोजी दुपारी १ च्या आसपास त्यांनी त्यांच्या नूतन वास्तूत स्वत:च्या तेरवीचा कार्यक्रम ठरविला होता. पूजा पण ठेवली. मुहूर्तावर डबरासे दाम्पत्याने पूजाअर्चा केली. आप्त तर कालच मुक्कामी आले. अनेक नातेवाईक व मित्रांनी दुपारनंतर डबरासे यांचे घर गाठले. डबरासे यांच्या मृत्यूपूर्व तेरवीला आपण जात आहोत, तेथील वातावरण काय असेल, एकंदरितच डबरासे यांचा हेतू तरी काय, अशी शंका घेऊन अनेकजण आमंत्रणाचा आदर करत डबरासे यांच्या घरी पोहोचले.
तेथील वातावरण एखाद्या लग्नप्रसंगाला साजेसे होते. त्यामुळे अनेकांचा जीव भांड्यात पडला. घरच्यांचा विरोधदेखील मावळला. ‘काय राजेहो’, ‘सुखदेवराव, असे कुणी करीत असते का’, अशी विचारणादेखील झाली. पण जे काही ते जिवंतपणीच. त्यामुळे मृत्यूपूर्व तेरवीचा बेत आखला. तुमची सर्वांची भेट घ्यायची होती. तुम्ही आलात, अन् मन गहिवरले. अशा शब्दात सुखदेव डबरासे यांनी सुहास्यवदनाने आमंत्रितांची आवभगत केली.
भरून पावलोकाही जण सहा महिन्यात, तर काही जण वर्षात जातात. मी मात्र साडेपाच वर्षांपासून निवृत्तीवेतनाचा आनंद घेत आहे. भलाचंगा आहे. त्यामुळे आप्तस्वकियांसोबत खात्यातील मित्रांची भेट व्हावी, ही भावना होती. तेरवीत कोण आले, हे मला कसे कळणार? मग काय स्वत:च्या मृत्यूपूर्व तेरवीचा कार्यक्रम ठेवला. उपस्थितांनीही त्याला दाद दिली.- सुखदेव डबरासे, निवृत्त पोलीस उपनिरीक्षक.