तिवसा : शहरात महिनाभरात डेंग्यूसदृश आजाराचे ३० रुग्ण आढळले आहेत. शनिवारी सकाळी एका १८ वर्षीय युवकाचा डेंग्यूने मृत्यू झाला. यामुळे महिनाभरात दोन मृत्यूची नोंद शहरात झाली आहे.
तिवसा शहरात मलेरिया, डेंग्यू व वातावरणातील बदलामुळे विविध आजारांनी डोके वर काढले आहे. सर्वाधिक तक्रारी तापाच्या आहेत. तिवसा ग्रामीण रुग्णालयातील सर्वच खाटा रुग्णांनी हाऊसफुल झाल्या आहे. येथे डेंग्यूसदृश आजाराने ग्रस्त सर्वाधिक बालके आहेत. सद्यस्थितीत रुग्णालयात ३० हून अधिक रुग्ण डेंग्यूसदृश व संसर्गजन्य आजारावर रुग्णालयात उपचार घेत आहेत.
म्म्यान, देवांश प्रमोद वाट (१८, रा. तिवसा) या तरुणाचा डेंग्यूने अमरावतीच्या खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला, त्याला तिवसा येथे डेंग्यूची लागण झाली होती. त्याने देहदानाचा संकल्प केला होता. त्यामुळे त्याचा मृतदेह डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाला सोपविण्यात आला.
----------------
शहर घाणीच्या विळख्यात
तिवसा नगरपंचायतवर आठ महिन्यांपासून प्रशासक आहे. शहरात दररोज स्वच्छता केली जाते व कचरा उचलला जातो, असा दावा नगरपंचायतच्यावतीने करण्यात येतो. मात्र, महिन्याला आठ ते दहा लाख रुपये खर्च स्वच्छतेवर करूनही शहर घाणीच्या विळख्यात अडकले आहे. नियमितपणे फवारणी करून स्वच्छ पाणीपुरवठा करण्याची मागणी नागरिक करीत आहेत. पालकमंत्र्यांनी नगरपंचायतच्या आढावा बैठकीत याबाबत नाराजी व्यक्त केली होती.
----------------
नागरिकांनी पाणी उकळून प्यावे. परिसरात स्वच्छता ठेवावी. रुग्णालयात रुग्णांनी योग्य प्रकारे काळजी घेण्यात येत आहे. दूषित पाणीपुरवठा विविध आजाराचे कारण आहे.
- डॉ. गौरव विधळे, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक