अपघाताला दोन वर्ष पूर्ण : भीषण अपघाताच्या आठवणी आजही कायममोहन राऊत धामणगाव रेल्वेआपले संपूर्ण आयुष्य गाव विकासासाठी अर्पण केल्यानंतर आज ही ना शासनाने ना प्रशासनाने कोणतीही मदत देण्यासाठी पुढाकार घेतला नाही. त्या पाचही सरपंचाच्या कुटुंबांतील सदस्य शासकीय मदतीसाठी लालफीत शाहीचा दरवाजा ठोठावत आहेत़ सर्वांनी दिलेले त्यावेळेचे आश्वासन हवेतच विरले असल्याची खंत या कुटुंबांनी व्यक्त केली आहे़ दोन वर्षांपूर्वी १५ फेब्रुवारी रोजी रात्री जळगाव येथे सरपंच परिषदेला जात असताना चिखलीजवळ स्कार्पिओ वाहन झाडावर आदळल्याने यात जुना धामणगाव येथील सरपंच प्रवीण गुल्हाने, वाठोड्याचे सरपंच नरेंद्र बहुरूपी, ढाकुलगावचे सरपंच मंगेश म्हात्रे व गुंजी येथील रहिवासी अरूण टाले हे जागीच ठार झाले होते़ दीड महिन्यांनी या अपघातात जखमी झालेले झाडा येथील सरपंच अतुल कोंबे यांची प्राणज्योत उपचारा दरम्यान मालवली होती़ या घटनेला दोन वर्षे पूर्ण झाले असतानाही कोणत्याच प्रकारची शासनाने मदत केली नसल्याचे तालुक्यातील चारही सरपंचांचा संसाराचा गाडा केवळ शेतीच्या भरवशावर चालत होता़ वर्षभर शेतात राबून आलेल्या उत्पादनातून जन्मदात्यासोबत आपल्या कुटुंबांचा खर्च चालविताना त्यांना मोठ्या कसरतीला सामोरे जावे लागत होते. ग्रामपंचायतमधील पाणीपुरवठ्याचे थकीत वीज बिल भरले नाही, तर दुसऱ्या दिवशी गावातील वीजपुरवठा खंडित होतो त्यामुळे वेळप्र्रसंगी उसनवारीचे पैसे घेवून गावातील वीज देयक भरण्यासाठी या सरपंचासह गुंजी येथील मृत अरूण टाले यांचा पुढाकार राहत असे. घरावर तुळशीपत्र ठेवून गावाच्या विकासासाठी धावणारे व्यक्तिमत्त्व म्हणून तालुक्यात या पाचही जणांची ओळख होती़ या घटनेला दोन वर्षे पूर्ण झाले असले तरी या कुटुंंबातील बोबडे शब्द आजही अनेक प्रश्न करीत आहे़ मात्र, त्यांना या नियतीच्या चक्रव्यूहामुळे एकच उत्तर कुटूंबप्रमुखाला द्यावे लागत आहे़ जुना धामणगाव येथील अपघातात ठार झालेल्या प्रवीण गुल्हाने यांचा छोटा मुलगा हिमांशू व मुलगी हे आपल्या आईला आजही वडिलांविषयी अनेक प्रश्न विचारतात. हीच स्थिती वाठोडा येथील मृत सरपंच नरेंद्र बहुरूपी तसेच झाडा येथील मृत सरपंच अतुल कोंबे यांच्या घरची आहे़
'त्या' सरपंच कुटुंबांना अद्यापही मदत नाही
By admin | Published: February 15, 2016 12:35 AM