अमरावती : वारंवार विनंती अथवा सांगूनही उघड्यावर शौचास बसणाऱ्यांची संख्या वाढतच चालली आहे. त्यावर उपाय म्हणून जिल्हा परिषदेमार्फत लोटाबहाद्दरांवर पुष्पक कारवाईची मोहीम ८ जानेवारी रोजी जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात ४ तालुक्यांतील निवडक गावात पंचायत समिती व स्थानिक पातळीवरील समितीच्या माध्यमातून ही मोहीम राबविण्यात आली.
२०१२ मध्ये जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांचे पायाभूत सर्वेक्षण करण्यात आले. शौचालय नसलेल्या कुटुंबांना विविध योजनेतून शौचालय उपलब्ध करून देण्यात आले. मात्र ग्रामीण भागात अनेक नागरिक आजही प्रांत: विधीसाठी उघड्यावर जातात. शौचालयाची नियमित देखभाल नसल्याचे कारण देत अनेकांनी हा मार्ग निवडला आहे. ही बाब मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांच्या निदर्शनास येताच. त्यांनी सर्व पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना तात्काळ गुड मॉर्निंग तसेच गुडव्हिनिंग यासारखे उपक्रम राबवून गांधीगिरीने उघड्यावर बसणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले. त्याकरिता दक्षता समिती गठित करण्यात आली. त्यात तालुका स्तरावर विस्तार अधिकारी, अंगणवाडी सुपर वाझर आणि बीआरसी कर्मचारी यांचे पथक गठित केले आहे. ग्रामस्तरावर स्वच्छताग्रही, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य, सचिव तसेच युवक-युवतींचा समावेश करण्यात आला आहे. उघड्यावर प्रांत:विधी होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या प्रकाराला आळा घालण्यासाठी शुक्रवारी सकाळी वरूड, नांदगाव खंडेश्र्वर, चांदूर रेल्वे आणि अमरावती तालुक्यातील काही गावांत सकाळी तालुकास्तरावर स्वच्छ भारत मिशनचे नोडल अधिकारी, विस्तार अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गुड मॉर्निंग गुडईव्हिंनिंग पथकाने धडक देत उघङयावर शौचास जाणाऱ्यांचा गुलाबपुष्पाने स्वागत केले.
बॉक्स
अनेकांची उडाली भंबेरी
सकाळी उठल्यानंतर प्रांत: विधीला उघड्यावर लोटा घेऊन जाणाऱ्या अनेकांना अचानकच गुड मॉर्निंग पथकाने हेरून अशा व्यक्तीना उघड्यावर शौचालय जात असल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आणि ही बाब आरोग्याच्या दृष्टीने योग्य नाही. त्यामुळे आपल्याकडील शौचालयाचा नियमित वापर करण्याचा सल्ला पुष्पक कारवाई करताना दिला.