जिल्ह्यातील कंंत्राटी कामगारांना करावे लागते कमी वेतनात काम, सुट्टी मिळत नसल्याने वाढला ताण
अमरावती : जिल्हा सरकारी रुग्णालय अथवा सुपर स्पेशािलटीमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २२५ वार्डबॉयची भरती करण्यात आली आहे. या वार्डबॉयना सात दिवस सलग सुमारे ६ ते ७ तास काम करावे लागत आहे. जिवाभावाचे नातलग दूर होत असताना रुग्णांना ते मायेचा घास भरवत आहेत. अहोरात्र राबणाऱ्या आणि रुग्णाचा मृतदेह पॅकिंग करणाऱ्यांच्या हातात दिवसाकाठी फक्त ४०० रुपयेच पडत आहेत.
कोरोनाच्या संसर्गाने रुग्णालये भरलेली आहेत. कोरोना हा संसर्गजन्य आजार आहे. कोणतीच खबरदारी घेतली नाही तर त्याचा संसर्ग होण्याचा अधिक धोका आहे. याचसाठी सरकार आणि प्रशासन कोरोनाला रोखण्यासाठी विविध उपाययोजना आखत आहे. मास्क, सॅनिटायझर आणि सामाजिक अंतर राखले गेले नाही तर कोरोनाची शिकार झाल्याचे आपल्या डोळ्यासमोर आहे. कोरोना झालेल्या रुग्णाजवळ रक्ताचे नातेवाईक देखील जाण्यास घाबरतात. त्यामुळे त्यांची काळजी घेण्याची जबाबदारी डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय यांच्यावरच आहे. विशेष करुन वॉर्डबॉय हे रुग्णांच्या जास्त संपर्कात येतात. रुग्णांना औषधे देणे, त्यांना जेवण भरवणे, ऑक्सिजन लावणे, वॉर्डची स्वच्छता करणे, त्याचबरोबर एखादा रुग्ण दगावल्यास त्याला उचलणे, त्याचा मृतदेह पॅकिंग करणे अशी सर्व कामे वॉर्डबॉय करतात. सेवा बजावत असताना ते स्वत:च्या जिवाची फिकीर करीत नाहीत. सकाळी ७ वाजता पीपीई कीट अंगात घातल्यावर रात्री १२ वाजता काढावा लागतो. या कालावधीत त्यांची चांगलीच दमछाक होते. त्यांना कमी पगारात राबावे लागत आहे. जिवाचे काही बरे-वाईट झाल्यास कुटुंबाची जबाबदारी कोण घेणार, अशी चिंता लागते. परंतु, पोटाची आग विझविण्यासाठी त्यांना हे काम करावे लागत आहे. पगार १२ हजार रूपये आहे. मात्र, हातात ११ हजार रुपयेच मिळतात. त्यामुळेही त्यांच्यामध्ये नाराजी आहे.
बॉक्स
पोट भरले एवढे पैसे द्या, नोकरीत कायमस्वरुपी घ्या !
१. कमी पगारामध्ये जीव धोक्यात घालून काम करावे लागते. त्यामुळे सरकारने पगार वाढविला पाहिजे आणि पूर्ण पगार हातात दिला पाहिजे.
२. आठवड्यातून एकदाही सुट्टी दिली जात नाही. किमान ६-७ सलग तास काम करावे लागते. चांगलीच दमछाक होते.
३. आम्ही काम करतोय, त्यामुळे आम्हाला सरकारने कायम स्वरुपी नोकरीत सामावून घेणे गरजेचे आहे.
४. जीव धोक्यात घालून काम करतो. आम्हाला कसलेच संरक्षण नाही. आमच्या जिवाचे बरेवाईट झाल्यास त्याला जबाबदार कोण?
--------------
बॉक्स
काय असते काम ?
विशेषकरुन वॉर्डबॉय हे रुग्णांच्या जास्त संपर्कात येतात. रुग्णांना दाखल करताना आणि सुट्टी देताना यांचीच गरज लागते. औषधे देणे, त्यांना जेवण भरवणे, ऑक्सिजन लावणे, वॉर्डची स्वच्छता करणे, रुग्णांचे कपडे बदलणे, त्याचबरोबर एखादा रुग्ण दगावल्यास त्याला उचलणे, त्याचा मृतदेह पॅकिंग करणे अशी सर्व कामे वॉर्डबॉय करतात. सेवा बजावत असताना ते स्वत:च्या जीवाची काळजी करीत नाहीत. सकाळी ७ वाजता पीपीई कीट अंगात घातल्यावर दुपारी २ वाजता काढावा लागतो.
--------------
बॉक्स
२२५ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कंत्राटी पद्धतीने भरलेली पदे
४०० दिवसाला रोजगार
कंत्राट - ११ महिन्यांचे
------------
मृतदेहाचे पॅकिंग आणि शिफ्टींग, तरीही कामाचे मोल नाही
कोट
सलग ७ ते ८ तास काम करावे लागते. सकाळी ७ वाजता पीपीई कीट अंगात घातल्यावर तो दुपारी २ वाजता काढावा लागतो. त्यामुळे घामाघुम व्हावे लागते. फारच दमछाक होते. एक सुट्टीसुद्धा मिळत नाही. काम करतो तेवढा मोबदला मिळायला पाहिजे.
- आकाश पाटील.
---------------
कामाएवढा मोबदला देण्यात येेत नाही. कमी पगारात राबावे लागते. तेही आम्ही करतो. कारण पोट भरायचे असते. सरकारने आमच्या व्यथा समजून घेणे गरजेचे आहे. सुट्टी मिळत नाही. वेळेवर पगार नाही. सरकारने कायमस्वरुपी नोकरीत घ्यावे.
-संजय शिंदे
------------
कामाला एकदा सुरुवात झाली की, किती वेळ झाला याकडे लक्ष लागत नाही. लहान मुलाप्रमाणे रुग्णांना सांभाळावे लागते. कामाचे तास कमी करुन एक सुट्टी दिली पाहिजे. कमी पगारामध्ये काम करावे लागते. सरकारने आम्हाला कायम सेवेत घेणे गरजेचे आहे.
-विनय ठाकूर