संस्कृती : ढोल-बासरीच्या स्वरांनी निनादला मेळघाटनरेंद्र जावरे चिखलदरा वर्षभर चाकरमाण्यासारखी सेवा देणाऱ्या मेळघाटातील थाट्या (गुराखी) तीन दिवस सुटीवर असून दिवाळीनंतर भरणाऱ्या पहिल्या आठवडी बाजारात त्यांच्या ढोलकीवर थाप, पायात घुंगरू आणि बासरीच्या स्वरांनी आसमंत निनादून गेला होता. गुरूवारी तालुक्यातील काटकुंभ व हतरू येथील बाजारात हजारो आदिवासींनी उपस्थिती दर्शविली. गुरूवारी नवा पेहराव, पायात घट्ट धोती, शर्ट त्यावर कोट, पायात घुंगरू, लांब बासरी, मोठे ढोल घेऊन दुपारी ३ वाजता दाखल झाले. काटकुंभ व अतिदुर्गम हतरू येथे दुपारचा आठवडी बाजार होता. गाय गोंदणानंतर मेळघाटातील आदिवासी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी होतात. संस्कृतीचा वारसा जपण्याच्या उद्देशाने गावागावांतील थाट्या एकत्र येवून मालकाकडून पैसे व धान्य घेतात. यातून गावशिवारावर गाव भोजनाचा कार्यक्रम केला जातो. सिड्डू अन् बकराआदिवासी संस्कृतीचा मान सिड्डू (मोहाची दारु), बकऱ्याचे मांस, भात, पुरी असे पक्वान्न यानिमित्त तयार केला जातो. यथेच्छ ताव मारीत सण साजरा करण्याची ही परंपरा मेळघाटच्या संस्कृतीचा वारसा पुढे नेणारी ठरली आहे.
हतरू, काटकुंभच्या ‘थाट्या’ बाजारात हजारोंची गर्दी
By admin | Published: November 22, 2015 12:11 AM