अमरावती/ मुंबई : हिंगोली, खामगाव, बोपीमध्ये (अमरावती) आॅईल रिफायनरी तसेच सॉलव्हंट प्रकल्पाच्या व्यवहारात पुरवठादाराचे कोट्यवधी रुपये तसेच जीएसटीच्या स्वरुपात २५० कोटींहून अधिक रक्कम बुडविणारा उद्योगपती नितीन जाधव याला सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) विदेशात फरार होण्याआधी मुंबई विमानतळावर बेड्या घातल्या. तो सिंगापूरला जाण्याच्या तयारीत होता. त्यामुळे विजय मल्ल्या आणि नीरव मोदी प्रकरणाची पुनरावृत्ती टळली आहे.
ईडीचे छापे : विदेशात पळून जाण्याचा प्रयत्न फसला
ईडीने जाधव आणि त्याचा मेहुणा मुन्ना पाटील यांची शुक्रवारी तिसऱ्या दिवशीही कसून चौकशी केली. आतापर्यंतच्या तपासात जाधवने व्यापारी आणि बँकांना ६०० कोटींपेक्षा जास्त रकमेने लुबाडल्याचे संकेत मिळाले आहेत. त्याचे जाळे मध्यप्रदेशपर्यंत पसरल्याचे आढळून आले. जाधव आणि त्याच्या मेहुण्याला बुधवारी मुंबई विमानतळावर अटक करण्यात आली. गुरुवारी त्याच्या औरंगाबाद, मुंबई आणि खामगावच्या कार्यालयांवर छापे टाकले असता आक्षेपार्ह दस्तावेज आढळून आले. शुक्रवारी दिवसभर ईडीच्या अधिकाºयांनी कागदपत्रांची तपासणी चालविली होती. बांद्रा-कुर्ला कॉप्लेक्समधील त्याचे मुख्य कार्यालय, अकोला- अमरावती राज्य मार्गावरील बोपी येथील गजानन आॅईल प्रा. लि. हिंगोलीतील गजानन गंगामाई मिल, खामगाव येथील गजानन सॉल्व्हंट आणि गजानन रिफायनरीत एकाचवेळी छापे मारण्यात आले. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत ही मोहीम सुरू होती.
नितीन जाधव हा मूळचा औरंगाबादचा असून तो मुंबईत स्थायिक झाला आहे. एकट्या अमरावती विभागात त्याने व्यापाºयांची व्हॅट, जीएसटी आणि टीडीएसच्या नावावर सुमारे २५० कोटींनी लुबाडणूक केली. त्याने बँकांकडून किती कर्ज घेतले आणि बुडविले याचा तपास केला जात आहे. अमरावतीचे टॅक्स बार असोसिएशन, सीए असोशिएन आणि चेंबर आॅफ कॉमर्स अॅन्ड इंडस्ट्रिजने नागपूर विभागाच्या जीएसटी आयुक्तांकडे तक्रार केली होती. त्यानंतर त्याच्या व्यवहारावर करडी नजर ठेवली जात होते.