अमरावती : किराणा दुकानाचा व्यवसाय करणाऱ्या महिलेस क्षुल्लक कारणावरून अश्लील शिवीगाळ केली तसेच हात पकडून नालीत पाडून विनयभंग केला. तसेच बलात्कार करण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना वलगाव ठाणे हद्दीतील साहूर येथे रविवारी घडली.
पोलीससुत्रांनुसार, अंकुश उर्फ महाराज अशोक हिरपूरकर (२४), प्रमोद भगवंतराव धाकडे (३५, दोघेही रा. साहूर) यांच्याविरुद्ध एका ४५ वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून भादंविची कलम ३५४ (अ) (ब), ३२३, २९४, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. फिर्यादी महिलेचे घरासमोर छोटेसे किराणा दुकान आहे. आरोपी या ठिकाणी आले. तुझ्या दुकानातील अंडे आम्ही चोरले का? असा सवाल करुन महिलेशी वाद घातला. अंकुशने महिलेचा हात पकडून विनयभंग केला. तसेच बलात्कार करण्याची धमकी दिली. तसेच महिलेला मारहाण केली. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपीना अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.